Om rajenimblakar, ravindra gaikwad Sarkarnama
मराठवाडा

Ravindra Gaikwad : ओमराजेंना टक्कर देण्यासाठी नॉट रिचेबल रवी गायकवाड अ‍ॅक्शन मोडवर!

Sachin Waghmare

Political News : लोकसभेच्या २०१४ साली प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या प्रचारासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणाऱ्या ओम राजेनिंबाळकर यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रा. रवींद्र गायकवाड यांना डावलून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली अन निवडूनही आणले. ओमराजेमुळे आपला राजकारणातील पत्ता कायमचा गुल झाला असल्याचे जाणीव झाल्याने त्यावेळेपासून प्रा. गायकवाड नाराज होते. त्यामुळे ते राजकारणापासून काहीकाळ लांब राहिले. मात्र, शिवसेना फुटीनंतर काही दिवस ठाकरे यांना साथ देणाऱ्या रवींद्र गायकवाड यांनी सत्तेत जाणे पसंत केले. शिंदे गटाचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून त्यांच्या राजकीय आकांक्षेला धुमारे फुटल्याने रवी गायकवाड लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत.

धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या मोळी टाकण्याचा कार्यक्रमप्रसंगी धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड (Ravindra Gaikwad) आणि पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर दोनच दिवसांत त्यांच्याकडे रवी सरांची शिंदे गट जिल्हा संपर्कप्रमुख पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन धाराशिवची जागा 'शिवसेना-शिंदे गटाला सुटली तर मी निवडणूक लढवणार' असा दावा त्यांनी केला.

धाराशिव लोकसभेची जागा महायुतीमध्ये कॊणाला सुटणार यावर बरेच काही अवलंबुन असणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. शिंदे गटाला जागा सुटली तर मीच उमेदवार असणार, अशी घोषणा रवी सरांनी केली तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसला सुटली तर सुरेशदाजी बिराजदार उमेदवार असतील व भाजपला जागा सुटली तर त्यांचा उमेदवार अद्याप ठरलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय येथे कोणालाही उमेदवारी मिळाली तरी, या जागेची जबाबदारी माझ्यावर असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. गायकवाड हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू होते. विविध कारणांवरून प्रा. गायकवाड यांना शिवसेनेतून दोन वेळा बाहेर काढण्यात आले. दोन्ही वेळा त्यांना परत घेण्यात आले. दोन वेळा बाहेर काढून नंतर शिवसेनेत प्रवेश मिळवणारे प्रा. गायकवाड हे एकमेव असावेत. उद्धव ठाकरे यांनी २००५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून केशव ऊर्फ बाबा पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबा पाटलाना दिलेले तिकीट रद्द करून पुन्हा रवी सराना दिले होते. २०१४ मध्ये ओमराजेना आमदार करण्यासाठी रवी सरांनी मदत केली होती. त्यांनीच उमेदवारी मिळवून देत निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते.

डॉ. तानाजी सावंत यांच्यामुळेच गेलेली खासदारकी पुन्हा मिळणार का ?

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत गायकवाड हे धाराशिव मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर विजयी झाले होते. त्यापूर्वी दोन वेळा ते उमरगा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. गायकवाड यांची मतदारसंघावर चांगली पकड होती. लोकांमध्ये ते अत्यंत सहजपणे मिसळायचे. कुणाशी वैरभावही ठेवत नसत. निवडणूक संपली की विरोधकांवरची टीका-टिप्पणी संपली, असा त्यांचा स्वभाव. दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या जवळ गेलेल्या डॉ. तानाजी सावंत यांचा धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश झाला. सावंत यांनी पक्षसंघटनेवर नियंत्रण मिळवायला सुरुवात केली. प्रा. गायकवाड यांना विश्वासात न घेता जिल्हा संपर्कप्रमुखपदी तानाजी सावंत यांना नेमण्यात आले. त्याचवेळी स्थानिक नेते, आमदार, खासदारांना डावलून पक्ष संघटनेत लुडबूड केल्याचा फटका रवी सरासह अनेकांना बसला होता. त्यामुळे २०१९ साली डॉ. तानाजी सावंत (tanajai sawant) यांच्यामुळेच त्यांची गेलेली खासदारकी या निमित्ताने पुन्हा मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बराच मोठा काळ होते एकांतवासात

रवी सरांची राजकीय कारकिर्द पाहता ते सुरुवातीला कमालीचे सक्रीय, काही काळ शांत, पुन्हा सक्रीय आणि अलिकडच्या काळात एकांतवासात राहिल्याचे दिसते. सन २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत पक्षाकडून तिकिट नाकारले गेल्यानंतर ते बराच काळ एकांतवासात असल्यासारखे, मौन आढळले. आमदार ज्ञानराज चौगुले शिंदे गटात गेल्यानंतरही त्यांनी विशेष प्रतिक्रिया दिल्या नाहीत. पत्रकारांनी केलेल्या प्रश्नांवर उत्तर म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे जाहीर केले. पुन्हा चौगुले यांनी गुवाहाटीवरुन 'माझे राजकीय गुरु रवी सरांच्या मार्गदर्शनाखाली येथे आलो' अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल केल्याने रवी सरांना आपली भूमिका लिखित स्वरुपात जाहीर करणे भाग पडले. तेव्हा त्यांनी 'कालही, आजही आणि उद्याही उद्धव ठाकरेंसोबत' असे पुन्हा स्पष्ट केले. चौगुले मतदारसंघात परतताच समीकरणे बदलली. काही दिवसाने रवी सर शिंदे गटात गेल्याची बातमी धडकली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT