Om Rajenimbalkar Rebellion Sarkarnama
मराठवाडा

Om Rajenimbalkar Rebellion : ‘ओम राजेनिंबाळकरांचं बंड महिनाभरापासून शिजत होतं’; भावाचाच मोठा खुलासा, शिवसेना ठाकरे पक्षात खळबळ

Om Rajenimbalkar brother Makarand reveals inside story behind Shiv Sena UBT MP rebellion, exposing month-long planning before joining Eknath Shinde camp : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील सहा खासदारांनी बंड करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Shiv Sena UBT Breaking News : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसलेल्या मोठ्या धक्क्यानंतर आता बंडखोर खासदारांच्या हालचालींवर नवे खुलासे समोर येऊ लागले आहेत.

पक्षातील सहा खासदारांनी बंड करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या बंडखोरांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर!

आता या बंडामागील पडद्यामागची कथा स्वतः त्यांच्या कुटुंबातूनच समोर आली आहे. ओम राजेनिंबाळकर यांचे बंधू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांनी या संपूर्ण बंडखोरीबाबत मोठा खुलासा केला आहे.

मकरंद राजेनिंबाळकर यांनी दावा केला की, ओम राजेनिंबाळकर (Om RajeNimbalkar) यांचे बंड अचानक झालेले नसून त्याचे नियोजन मागील महिनाभरापासून सुरू होते. विशेष म्हणजे या निर्णयाबाबत ओम राजेनिंबाळकर यांनी महिनाभरापूर्वी स्वतः त्यांच्या भावासोबत चर्चा देखील केली होती.

गेल्या दहा वर्षांपासून राजकारणात एकत्र सक्रिय असलेले मकरंद राजेनिंबाळकर यांनी धाराशिव नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदही भूषवले आहे. त्यांनी सांगितले की, ओम राजेनिंबाळकर यांनी घेतलेला निर्णय आपल्याला मान्य नव्हता. हा निर्णय चुकीचा आहे आणि तो मागे घ्यावा, यासाठी आपण खूप प्रयत्न केले. मात्र त्यांनी अखेर पक्षांतराचा निर्णय कायम ठेवला.

मकरंद राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ओमराजे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असला तरी मी मात्र उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहे. यावेळी त्यांनी ओम राजेनिंबाळकर यांच्या निर्णयावर थेट टीका टाळली. पण एक महत्त्वाची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी ओम राजेनिंबाळकर यांना एकदा आमदार आणि सलग दोनदा खासदार बनवले. उद्धव साहेबांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता.

धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असल्याचे सांगत मकरंद राजेनिंबाळकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे धाराशिव आणि येथील जनतेवर मुलासारखे प्रेम आहे. या कठीण काळात आम्ही पक्षासोबत खंबीरपणे उभे राहणार आहोत. याच पार्श्वभूमीवर येत्या 28 जून रोजी उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये होणारी सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ही सभा ऐतिहासिक करण्यासाठी गावोगावी बैठका सुरू असून पुन्हा एकदा धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध करून दाखवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सहा खासदारांच्या बंडानंतर शिवसेना ठाकरे पक्षात निर्माण झालेल्या राजकीय भूकंपाचे पडसाद आता थेट जिल्हास्तरावर उमटू लागले असून, पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT