Omraje Nimbalkar- Devendra Fadnavis - Kailas Patil .jpg Sarkarnama
मराठवाडा

Omraje Nimbalkar: फडणवीसांची ठाकरेंच्या शिलेदाराला एकदा नव्हे तर दोनदा मंत्रिपदाची ऑफर, पण...; ओमराजेंचा खळबळजनक दावा

Dharashiv Assembly Election 2024 : खासदार निंबाळकर म्हणाले, जी व्यक्ती सोन्याच्या लंकेपर्यंत गेलेली होती. पण त्यावर लाथ मारत आपली निष्ठा विकली नाही, ज्यानं आपल्या धाराशिवच्या नावाला गद्दारीचा कलंक लावला नाही. असा खुद्दार आमदार आपल्या मतदारसंघाला मिळाला आहे.

Deepak Kulkarni

Dharashiv News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मराठवाड्यातील विश्वासू शिलेदार अशी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची ओळख आहे. लोकसभेला प्रचंड मताधिक्क्याने धाराशिवच्या जागेवरुन निवडून आलेल्या ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी आता कैलास पाटलांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. यातच आता ओमराजेंनी उपमुख्यमंत्री आणि भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीसांबाबत धक्कादायक दावा केला आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर हे धाराशिव येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कैलास पाटील यांच्यासाठीच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.तसेच फडणवीसांविषयी मोठा गौप्यस्फोट केला. आपल्याच फोनवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फोन केला होता.तेव्हा त्यांनी तुमची अडचण आहे,पण कैलास पाटलांना काय अडचण आहे अशी विचारणा केली होती. तेव्हा त्यांना तेही आपल्यासोबतच असल्याचं सांगितलं होतं.

यावेळी आपण कैलास पाटलांना फोन देत फडणवीसांना त्यांच्याशी बोलायला सांगितलं.त्यांना फडणवीसांनी पहिल्यांदा राज्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती.पण आमदार कैलास पाटील यांनी त्यांची ऑफर धुडकावत स्पष्ट शब्दात फडणवीसांना नकार दिला, असंही खासदार ओमराजे म्हणाले.

पुन्हा काही वेळानं फडणवीसांनी फोन करत कैलास पाटलांना थेट कॅबिनेट मंत्री करतो अशी ऑफर दिली. तेव्हा आमदार कैलास पाटील यांनी आपल्याला मुख्यमंत्री जरी केलं तरी आपण तिकडे येणार नसल्याचं ठामपणे त्यांना सांगितलं. अशाप्रकारे पाटील यांनी फक्त पन्नास खोक्यांना लाथ मारली नाही तर मंत्रिपदावरही पाणी सोडलं. याचे आपण स्वतः साक्षीदार आहोत असं खळबळजनक विधान ओमराजे निंबाळकर यांनी केलं आहे.

खासदार निंबाळकर म्हणाले, जी व्यक्ती सोन्याच्या लंकेपर्यंत गेलेली होती.पण त्यावर लाथ मारत आपली निष्ठा विकली नाही, ज्यानं आपल्या धाराशिवच्या नावाला गद्दारीचा कलंक लावला नाही. असा खुद्दार आमदार आपल्या मतदारसंघाला मिळाला आहे. ज्यांनी स्वाभिमानी राहून आपल्या पक्षाशी इमान राखलं व जनतेनं टाकलेल्या मताशी ते प्रामाणिक राहिल्याचंही ओमराजेंनी यावेळी सांगितलं.

ओमराजेंनी यावेळी महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेचाही समाचार घेतला. ते म्हणाले,विरोधक उगाच भीती दाखवत असून बटेंगे भी नही, और कटेंगे भी नही. तुम्ही जरा दम काढा. मोदीसाहेब, असताना देखील हिंदू धोक्यात कसा आहे? हिंदू, इस्लाम कोणीच धोक्यात नाही, यांची खुर्ची धोक्यात आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. तसेच परंडा मतदारसंघात ही गद्दारी झाली आहे, त्यांना यावेळी हिसका दाखवून द्या,असा इशाराही त्यांनी तानाजी सावंत यांना दिला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते...?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उमेदवार कैलास पाटलांसाठी जाहीर सभा घेतली होती.या सभेत त्यांनी लोकसभेला आपल्या पक्षाला सात आठ जागा कमी मिळाल्या व देशात सुद्धा अजून वीस पंचवीस ठिकाणी आपले खासदार झाले असते, तर मोदी आता हिमालयात गेले असते असा चिमटाही काढला होता.याचवेळी मला हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्या भाजपने नवाब मलिक आणि अनेक ठिकाणी काय केलं याचाही जाब ठाकरे यांनी भाजपला विचारला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT