Khaire-Sattar-Imtiaz Jalil
Khaire-Sattar-Imtiaz Jalil Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz jalil : सत्तार चालतात, मग मी का नको ? मंदिरांना मी पण निधी देतो..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एमआयएमला महाविकास आघाडी घ्या, असा प्रस्ताव खासदार इम्तियाज जलील यांनी राज्याचो आरोग्य मंत्री राजशे टोपे यांच्या मार्फत दिला. यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी तर या विषयावरून इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. औरंगजेबासमोर गुडघे टेकणारे, रझाकारांचा वारसा चालवणाऱ्यांसोबत शिवसेना (Shivsena) कदापी जाणार नाही, अशी कडक भूमिका खैरे यांनी घेतली.

यावर तुम्हाला औरंगाबाद म्हणणारे अब्दुल सत्तार चालतात ? मग मी का नाही ? असा चिमटा खैरे यांना काढला. सत्तार देतात तसा मी पण मंदिरांसाठी निधी देतो, असेही इम्तियाज जलील म्हणाले. आघाडीत सहभागी होण्याच्या एमआयएमच्या प्रस्तावाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आधी तुम्ही भाजप विरोधक आहात हे कृतीतून सिद्ध करा, म्हणत प्रस्ताव फेटाळला. शिवसेनेचे संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत तीन पक्षांशिवाय अन्य कुणाला स्थान नसल्याचे सांगितले आहे. तर काॅंग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी आपल्याकडे एमआयएमचा असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, तो आला की विचार करू, असे म्हणत हा विषय चर्चेत कसा राहील याची काळजी घेतली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्यात चांगलाच कलगितुरा रंगला आहे. एमआयएम महाविकास आघाडीत का नको ? याची अनेक उदाहरणे खैरे यांनी सांगितली. आमचा पक्ष हिंत्ववादी आहे, तुम्ही शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना, संभाजीनगर नावाला विरोध करता. तुमचा पक्षा रझाकारांचा वारसा चालवतो, औरंगजेब तुमचा आदर्श आहे, अशा पक्षाला शिवसेना कदापी सोबत घेणार नाही, असे खैरे यांनी प्रसार माध्यमांच्या चर्चेतून ठणकावून सांगितले.

तर तुम्हाला संभाजीनगर न म्हणणारे अब्दुल सत्तार चालतात, तर मी का नको ? असा टोला खैरेंना लगावला. यावर अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे राज्यमंत्री आहेत, मी त्यांचा नेता आहे. त्यांनी मतदारसंघात किती कामे केली, हे एकदा जाऊन बघा. सर्वजाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ते विकास साधतायेत. मंदिरांना मोठ्या प्रमाणात निधी देतात. असे जातीभेद न करणारे गोरगरिबांना न्याय देणारे, मुस्लिम आम्हाला हवे आहेत. बाळासाहेब ठाकरेंची देखील हीच भूमिका होती, याची आठवण खैरेंनी करून दिली. तेव्हा मी ही मंदिरांना निधी देतो, सांगा कोणत्या मंदिराला किती निधी द्यायला, असे आव्हानच इम्तियाज यांनी खैरेंना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT