EX MLA Panditrao Deshmukh  Sarkarnama
मराठवाडा

EX MLA Panditrao Deshmukh : वसमतचे माजी आमदार पंडितराव देशमुख यांचे निधन

Former Vasmat MLA Panditrao Deshmukh passed away during treatment in Nanded: वसमतचे माजी आमदार आणि बहिर्जी शिक्षण संस्थेचे सचिव पंडितराव देशमुख यांचे नांदेड येथे उपचारादरम्यान निधन झाले. शिक्षण, राजकारण आणि सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे हिंगोली जिल्ह्यात शोक व्यक्त होत आहे.

Jagdish Pansare

Marathwada Political News : वसमत तालुक्याचे माजी आमदार आणि बहिर्जी शिक्षण संस्थेचे सचिव पंडितराव देशमुख यांचे नांदेड येथे उपचारादरम्यान वयाच्या 87 या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने वसमतच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू करून आमदारपदापर्यंत पोहोचलेल्या देशमुख यांनीनी शिक्षण आणि समाजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

पंडितराव देशमुख यांचा जन्म २० ऑगस्ट १९४० रोजी झाला. त्यांनी शिक्षक म्हणून बहिर्जी प्राथमिक विद्यालय, वापटी येथून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे बहिर्जी स्मारक विद्यालय, वसमत येथे मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावल्यानंतर ते निवृत्त झाले. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आणीबाणीनंतर जनता दलाच्या उमेदवारीवर जानेवारी १९७८ ते १९८० या कालावधीत त्यांनी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले.

लोकप्रतिनिधी म्हणून काम करतानाही त्यांनी शिक्षणाशी असलेले नाते कायम जपले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. बहिर्जी शिक्षण संस्थेच्या उभारणी आणि वाटचालीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. २००४ पासून ते बहिर्जी शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत होते. याशिवाय पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

शिक्षण, राजकारण आणि सहकार क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि संस्थेच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे वसमत तालुक्याच्या सार्वजनिक जीवनातील एका अनुभवी व्यक्तिमत्त्वाची उणीव निर्माण झाली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हट्टा गावासह वसमत तालुक्यात शोक व्यक्त होत आहे.

वसमत तालुक्याची हानी..

पंडितराव देशमुख सर यांच्या निधनाने वसमत तालुक्याची मोठी हानी झाली आहे. शिक्षक, लोकप्रतिनिधी आणि शिक्षण संस्थेचे पदाधिकारी म्हणून त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा शब्दात आमदार राजू नवघरे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

विश्वासू सहकारी, मार्गदर्शक हरपला..

पंडितराव देशमुख सर यांच्याशी माझे गेल्या ३०ते ३५ वर्षांपासून अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. ते माझे विश्वासू आणि खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. राजकीय वाटचालीत त्यांनी नेहमीच मोलाची साथ दिली. शिक्षक ते आमदार असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी होता. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या निधनाने माझा विश्वासू सहकारी, खंदा समर्थक आणि अनुभवी मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या निधनाने झालेली वैयक्तिक आणि सामाजिक हानी भरून न निघणारी आहे, अशा भावना माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी व्यक्त केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT