Beed Politics
Beed Politics Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : पंकजा मुंडे समेट करणार की नवा संघर्ष उभारणार ; भाजप -राष्ट्रवादी एकत्र लढणार..

Dattatrya Deshmukh

Beed News : राज्यातल्या नव्या राजकीय समीकरणात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याची घोषणाही झाली आहे. त्यामुळे परळी विधानसभेची जागा कोणाला हाच मोठा पेच निर्माण झाला आहे.

त्यामुळे जर समेट करायचा तर अगोदर मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आणि मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करावा लागणार आहे. या समेटातून मुंडे भावंडांतून एकजण विधानसभेला तर एक जण लोकसभेला असा पर्याय निघू शकतो. मात्र, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मतदार संघ बदलावा लागला तर नेतृत्व कुणाचे असणार , असा प्रश्न आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली. तेव्हापासून पंकजा मुंडे यांचे भाषण आणि संघर्ष हा शब्द कायम आहे. पुढे २०१९ च्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या भाषणातील संघर्ष शब्दाची धार आणखीच तीव्र झाली आहे. मात्र, आता राजकीय परिस्थिती पाहता त्यांना आपला संघर्ष तर अधिक तीव्र करावाच लागणार असून नव्यानेही हा संघर्ष उभारावा लागू शकतो.

संघर्ष आपल्या वाट्याला असून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचीच ति शिकवण असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे कायम म्हणत असतात. राज्यात रविवार (ता. दोन) पासून नव्याने उदयाला आलेल्या राजकीय समिकरणामुळे आता ‘समेट’ किंवा नवा संघर्ष असे दोनच पर्याय पंकजा मुंडे यांच्यासमोर आहेत.

नवा संघर्ष मोठा पण संधीही ठरू शकतो..

पंकजा मुंडे यांना राज्यात भाजपकडून साईडलाईन केल्याचे आणि त्यांची राज्य भाजप नेत्यांबाबतची नाराजी लपून नाही. त्यामुळे त्यांना अगोदर राज्य भाजपमध्ये एंट्री करण्यासाठीचा संघर्ष करावा लागणार आहे. किंवा मग थेट नवी भूमिका घेण्याचीही वेळ आहे. अनेक दिवसांपासून समर्थकांकडून देखील हीच मागणी आहे. पंकजा मुंडे या ओबीसीचा चेहरा मानल्या जातात. त्यासह त्यांच्या मागे समाजाच्या मतांची देखील मोठी व्होट बॅक आहे. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत देखील त्यांना मोठी संधी आहे. मराठवाडा, विदर्भ, नाशिक आदी भागात त्या मोठा परिणाम करु शकतात. मात्र, यासाठी त्यांना संघर्ष देखील मोठा करावा लागणार आहे.

हिशोब चुकता केला...

जिल्ह्यातील पुर्वीच्या काँग्रेसला दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी टक्कर दिली. त्यासाठी त्यांनी काँग्रेसमधील व नंतर राष्ट्रवादीतील एकेक शिलेदार आपल्या छावणीत ओढले. जिल्ह्यात १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप हे प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष राहीले.

२००९ साली दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढविल्यानंतर परळी विधानसभा पंकजा मुंडे यांनी भाजपकडून लढविली व जिंकलीही. त्याचवेळी या ठिकाणाहून तिकीट मिळावे, अशी धनंजय मुंडे यांची अपेक्षा होती. कारण, त्यावेळी धनंजय मुंडे सक्रीय राजकारणात तर पंकजा मुंडे समाजकारणात सक्रीय होत्या. तेव्हापासूनच दुरावा वाढून २०१२ मध्ये धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत श्री. मुंडे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. २०१९ मध्ये मात्र त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत हिशोब चुकता केला.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT