Crime News Sarkarnama
मराठवाडा

Parabhani News : परभणीत शेतकऱ्याची आत्महत्या; माजी आमदारांसह अन्य एकावर गुन्हा

Sachin Waghmare

Parabhani News : पाथरी येथील इंदिरानगर भागातील एका वृद्ध शेतकऱ्याने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली. घटना 13 ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. पंचनामा करीत असताना मयताच्या पँटच्या खिशात चिठ्ठी आढळून आली होती.

या चिठ्ठीत माजी आमदार अब्दुला खान लतिफ खान दुर्राणी उर्फ बाबाजानी दुर्राणी (Babajani Durani) यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याचे आढळून आले. यावरून माजी आमदार दुर्राणींसह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात मयताचा मुलगा अजयसिंह पाथरीकर यांनी 12 ऑगस्टला तक्रार दिली होती. त्यामध्ये वडील बाळकृष्ण शंकरराव कांबळे हे शेतात गेले होते.चारापाणी करून रात्री दहा वाजेपर्यंत ते घरी परतायचे. मात्र, ते आले नाहीत. त्यामुळे 13 ऑगस्टला पहाटे त्यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल केला, तर प्रतिसाद मिळाला नाही. प्रत्यक्ष शेतात गेल्यावर ते मृतावस्थेत आढळले. त्यानंतर, घरच्यांशी व पोलिसांशी अजयसिंह यांनी संपर्क साधला. (Parabhani News )

ही घटना समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून पाथरी येथील सरकारी रुग्णालयात मृतदेह नेले. तेथे पंचनामा करीत असताना चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीत माजी आमदार अब्दुल खान लतिफ खान दुर्राणी उर्फ बाबाजानी दुर्राणी यांच्याविरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर तक्रारी दिल्याचे आढळून आले.

उपलोकायुक्तांकडेही 2021 पासून दोन ते तीन तक्रारी दिल्या होत्या. त्यासोबतच काही नातेवाईक आणि शेजारी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. यात माझ्या कुटुंबीयांचा संबंध नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

माजी आमदारानी दिले नाहीत प्लॉटिंगचे पैसे

माजी आमदार बाबाजानी यांनी माजलगाव रोडवरील कॅनालजवळील प्लॉट, तसेच शेतजमिनीमधील पडलेली प्लॉटिंग यामध्ये वडिलांना ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत. त्यामुळे वडील तणावात होते. शेजारी विजय प्रभाकर वाकडे याच्यासह आमचे नातेवाईकही त्रास देत होते. त्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप मुलगा अजयसिंह पाथरीकर यांनी केला आहे. या प्रकरणात बीएनएस 108,3 (5) व अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम 1989 मधील 3 (2) (व्हीए) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदनाम करण्यासाठी राजकीय षडयंत्र

मयत बाळकृष्ण हा एके काळी माझा कार्यकर्ता होता. त्याला निराधार समितीचे अध्यक्षही मी केले होते. वर्षभरापूर्वी तो शिवसेना शिंदे गटात गेला होता. त्याच्याशी माझा कधी वादविवादही झाला नव्हता. मात्र, पक्षांतर करून तो ज्यांच्यासोबत गेला, त्यांनी त्याला हाताशी धरून माझ्याविरुद्ध हे राजकीय षडयंत्र रचले असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT