Parbhani Shivsena News Sarkarnama
मराठवाडा

Parbhani News : परभणीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट, काँग्रेसचा महापौर पदावर दावा, अर्जही भरला; ठाकरेंच्या खासदाराची वाढली धडधड

Parbhani Mayor Post Politics : सत्तेपासून दूर असलेल्या भाजपनेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमधील तानातानीच्या पार्श्वभूमीवर संधी हेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपनेही महापौरपदासाठी 3 उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही एक अर्ज दाखल केला आहे.

Jagdish Pansare

Shivsena UBT-Congress News : महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसने एकत्रित लढत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या सत्ताधारी पक्षांना रोखले. खासदार संजय जाधव यांनी परभणी शहरातील जातीय समीकरण लक्षात घेत मुस्लिम उमेदवारांना मैदानात उतरवले. काँग्रेससोबत आघाडी करत बहुमतासह सत्ताही मिळवली. पण महापौर पदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसनेही दावा करत अर्ज दाखल केल्याने परभणीत ट्विस्ट आला आहे.

महापौर पदावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये एकमत न झाल्याने आघाडीतील दोन्ही पक्षांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे संजय जाधव यांचे टेन्शन वाढले आहे. परभणीत महापौरपदाची निवडणूक होत असताना, सर्वच राजकीय पक्षांनी दावा करत 13 उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.

सर्वाधिक 25 नगरसेवक निवडून आणत मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेकडून सहा जणांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आघाडीत एकत्र लढलेल्या आणि 12 जागा जिंकलेल्या काँग्रेसनेही महापौर, उपमहापौर या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत. अर्थात माघारीच्या मुदतीनंतरच चित्र स्पष्ट होणार असले तरी काँग्रेसच्या या खेळीमुळे बंडू बाॅसचे टेन्शन वाढले आहे.

भाजप संधीच्या शोधात..

सत्तेपासून दूर असलेल्या भाजपनेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमधील तानातानीच्या पार्श्वभूमीवर संधी हेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपनेही महापौरपदासाठी 3 उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही एक अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या चार पक्षांचे मिळून महापौर पदासाठी आता एकूण 13 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महापौर पदासाठी दिलीपसिंह ठाकूर, श्याम खोबे, प्रतिभा सरोदे, माजू लाला, सय्यद इकबाल, शाबुद्दीन सिद्दिकी या 6 जणांनी तर उपमहापौर पदासाठी श्याम खोबे यांनी अर्ज दाखल केला. भाजपकडून महापौरपदासाठी डॉ. केदार खटींग, माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी मीनाताई वरपुडकर, रितेश जैन यांचा अर्ज दाखल झाला आहे. तर उपमहापौर पदासाठी विश्वजित बुधवंत यांनी अर्ज केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही महापौर पदासाठी अर्जुन सामाले, उपमहापौर पदासाठी नाजेमा बेगम शेख अब्दुल या दोघांचे अर्ज दाखल केले.

काँग्रेस हात देणार का?

काँग्रेसने महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार दिले आहेत. चंद्रपूर महापालिकेत साथ दिली तरच परभणीत सोबत राहू, अशी कोंडी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची केल्याची चर्चा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रत्यक्ष भेटीत वडेट्टीवार यांनी ही अट टाकल्याचे बोलले जाते. या संदर्भात अद्याप निर्णय न झाल्यामुळे दबाव तंत्राचा भाग म्हणून काँग्रेसने महापौर, उपमहापौर पदावर दावा करत अर्ज भरले असल्याचे बोलले जाते.

काँग्रेसकडून महापौरपदासाठी भगवान वाघमारे, गणेश देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उपमहापौर पदासाठी गुलमिर खान यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. परभणी महापालिकेच्या एकूण 65 जागांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 25, काँग्रेस 12, भाजप 12, राष्ट्रवादी 11 आणि अपक्ष 5 असे संख्याबळ आहे. येत्या 9 फेब्रुवारीपर्यंत आपापले नगरसेवक सांभाळण्याचे काम आता स्थानिक नेत्यांना करावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT