Sanjay jadhav, Meghna bordikar  Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Loksabha Constituency : परभणीतून मेघना बोर्डीकर मैदानात उतरल्या तर खासदार जाधवांची होणार पंचाईत !

Prasad Shivaji Joshi

Parabhni News : राज्यात शिवसेना-भाजप युती असताना लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाकडून एकमेकांना सहकार्य करण्याचे धोरण राबविले जायचे. काही मतदारसंघात उट्टे काढण्यासाठी युती असूनही मित्रपक्षाच्या उमेदवाराचा गेम केला जायचा. आता तर शिवसेनेत फूट पडली आहे, शिंदेच्या नेतृत्वाखाली एक सेना तर दुसरी उद्धव ठाकरेंची. अशावेळी युतीच्या काळात असलेली सगळी राजकीय समीकरणे गळून पडली आहेत.

परभणी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या विजयात बोर्डीकरांचा मोठा वाटा होता. रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना बोर्डीकर यांचे आणि खासदार जाधव यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध आहेत. एका कार्यक्रमात जाधव यांनी जाहीरपणे बोर्डीकर परिवाराचे ऋण व्यक्त केले होते. परंतु 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आता बोर्डीकर विरुद्ध ठाकरे गटाचे खासदार जाधव यांच्यातच थेट सामना होण्याची शक्यता आहे. असे झाले तर मात्र संजय जाधव यांची पंचाईत होणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना महाविकास आघाडी आणि महायुती यांनी अद्यापही उमेदवार जाहीर केले नाहीत. जागावाटपाचे भिजत घोंगडे अजूनही तसेच आहे. प्रशासनाने मात्र निवडणुकीची पूर्वतयारी जवळपास पूर्ण केली असल्याचे दिसून येत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या व इतर प्रशासकीय कामे पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजय जाधव (Sanajay Jadhav) हेच महाविकास आघाडीकडून तर भारतीय जनता पक्षाला परभणीची जागा मिळाल्यास जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर या प्रमुख दावेदार असल्याचे मानले जात आहे. खासदार संजय जाधव यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 2024 ची लोकसभा निवडणुकीत ते तिसऱ्यांदा नशीब आजमवणार आहेत.

शिवसेनेच्या खासदाराने पक्ष बदलण्याची परंपरा जाधव यांनी मोडली. विशेष म्हणजे पक्षात झालेल्या बंडाळीनंतरही जाधव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे निष्ठावंत हा मुद्दा घेऊन ते निवडणुकीत उतरणार आहेत. आध्यात्मिक वृत्ती आणि संत, महाराज मंडळींचा आशीर्वादही त्यांनी मिळवला आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी सोबत राहणार असल्यामुळे जाधव यांची हॅट्रीक साधली जाते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीकडून भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचार यंत्रणा राबवली आहे. महिनाभरापूर्वी लोकसभा समन्वयकांच्या नियुक्त्या त्यांनी केल्या आहेत. त्यानंतर विधानसभा निहाय आढावा बैठकांचे सत्र सुरु आहे. पक्षाने नुकतेच गाव चलो अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रवासी कार्यकर्त्यांची नियुक्त्या केल्या आहेत. प्रत्येक गावात हे कार्यकर्ते जाणार आहेत. त्यामुळे सध्यातरी परभणी लोकसभा मतदारसंघ भाजपकडे असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेच्या संजय जाधव यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी पक्षाकडून जिंतूर विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांचे नाव सर्वात पुढे असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रावादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांच्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे आग्रही आहेत. मात्र जिल्ह्यातील पक्ष वर्तुळात कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. 2019 च्या निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याने विटेकर यावेळेस प्रचंड आशावादी असल्याचे दिसून येत आहे. ते पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र जागावाटपाच्या वाटाघाटीत परभणी लोकसभा मतदारसंघ कोणाकडे जातो यावर सर्व अवलंबून आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT