Parbhani Municipal Corporation News : महापालिका निवडणुकीसाठी नांदेड, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये युती-आघाडीचा अद्याप निर्णय नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चोवी तास शिल्लक राहिले आहेत. अशावेळी परभणीत मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निमित्ताने परभणीत घड्याळाची टिकटिक आणि तुतारी एकाचवेळी वाजणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या युतीतील घटक पक्षाने आघाडीतील पक्षाशी हातमिळवणी केल्यानंतर आता शिवसेना-भाजपमध्ये युतीचा निर्णय कधी होतो? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. परभणी शहराच्या विकासासाठी व महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावण्यासाठी महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर (शरद पवार) एकत्र लढवणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी दिली.
महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) वतीने या नव्या समीकरणाची घोषणा करण्यात आली. प्रवक्ते सुरज चव्हाण, पक्ष निरीक्षक मधुकरराजे आर्दड, आमदार राजेश विटेकर (Rajesh Vitekar), महानगर अध्यक्ष प्रताप देशमुख,माजी विरोधी पक्ष नेते विजय जामकर, युवा नेते अक्षय देशमुख, दादासाहेब टेंगसे, रोहन सामाले यांच्या उपस्थितीत परभणीतील या नव्या युतीची घोषणा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार फौजिया खान यांच्या सोबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. फक्त कुणी कोणत्या जागा लढवायच्या यासाठी त्यांच्यासोबत बैठक होणार असून त्यानंतर युतीची घोषणा करण्यात येईल. पक्षाने स्थानिक परिस्थिती पाहून व पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रवादीतर्फे निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली जाणार आहे. निष्ठावंतांना देखील पक्ष निश्चितच न्याय देईल. पक्षाचे उमेदवार बंडखोरी करणार नाहीत, याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष विटेकर व महानगराध्यक्ष देशमुख यांच्यावर राहील, असेही चव्हाण म्हणाले.
निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाशी युती करणार का? या प्रश्नावर ही लढाई विकासासाठी आहे, कुणाच्या विरोधात नाही. महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार त्यामुळे भाजपाबरोबर युती करण्याची गरज पडणार नाही, असे दावा चव्हाण यांनी केला. जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला आहे, त्यामुळे महापालिका निवडणूकीत देखील पक्षाचा झेंडा फडकणार आहे, असेही चव्हाण म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.