Lok Sabha Election 2024 Sarkarnama
मराठवाडा

Parbhani DPDC Fund: आचारसंहिता खर्च करू देईना, अन् मार्च एंड निधीला थांबू देईना!

Maharashtra Lok Sabha Election 2024: विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक डावलण्यात आले व तसेच टक्केवारी घेऊन निधी वाटप करण्यात आले आहे, असा थेट आरोप खासदार संजय जाधव यांनी केला.

Prasad Shivaji Joshi

Parbhani: परभणीचे तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant)यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठीच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. मात्र, निधी वाटप करताना पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भेदभाव केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला.

ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय भांबळे या नेत्यांनी निधी वाटपाच्या यादीला कडाडून विरोध केला. केवळ सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींना निधी वाटप करण्यात आले व विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक डावलण्यात आले व तसेच टक्केवारी घेऊन निधी वाटप करण्यात आले आहे, असा थेट आरोप खासदार संजय जाधव यांनी केला.

विरोधी पक्षासह तानाजी सावंत यांच्या स्वपक्षातील नेत्यांनीही निधी वाटपासंदर्भात तक्रार केली. शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण देशमुख यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करून निधी वाटपाच्या यादीला स्थगिती देण्याची मागणी केली. यासंदर्भात न्यायालयात दाद मागण्यात आली. मात्र, न्यायालयाने यादी संदर्भातील सर्व आक्षेप फेटाळून लावत खर्च करण्यास मान्यता दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आचारसंहिता आणि मार्च एंड

विकास आराखड्यातील मंजूर निधी खर्च करण्यास मान्यता मिळाली असली तरी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024)आचारसंहिता लागू झाली आहे. विशेष म्हणजे 2023-24 हे आर्थिक वर्ष संपण्यास केवळ आठ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. विकास निधी खर्च करण्यासंदर्भातील प्रक्रिया पार पडणे शक्य नसल्याने अखर्चित निधी शासनास परत जाण्याची शक्यता आहे.

सत्याचा विजय : मेघना बोर्डीकर

न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्याचा विजय आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे जिल्ह्याला विकासापासून दूर ठेवले. मा. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पुढील निकाल जनतेच्या कोर्टात आहे. अशा नेत्यांचा जनता कधीच स्वीकार करणार नाही. जिंतूर सेलूकरांनी तर संकुचित वृत्तीच्या निर्लज्ज लोकांना घरी बसवले. कारण विकासाच्या आड येणाऱ्या नेत्यांचा जनता कधीच स्वीकार करत नाही. जिल्ह्यातील जनता आता खासदारकीचाही निर्णय लवकरच लावेल.

न्यायालयात दाद मागू : प्रवीण देशमुख

आचारसंहिता आणि मार्च एंडमुळे विविध विकासकामांसाठीचा निधी खर्च करता येत नसल्याने हा निधी सरकारला परत जाऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान होईल, असे होऊ नये यासाठी हा निधी राखीव ठेवण्यात यावा, यासाठी न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशी माहिती शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांनी दिली.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT