Operation Tiger: राज्यात एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर हाती घेतले आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार फोडत यशस्वीही केले. यामुळे शिंदे यांचे दिल्ली दरबारी वजन वाढल्याचेही बोलले जाते. ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. विरोधकांवर तोंडसुख घेत आम्ही कसं विकास कामे आणि निधीसाठी पक्ष सोडला हे सांगत आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी संघटनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला पक्ष सोडावा लागला, असे सांगीतले.
परंतु पक्षांतरासाठी संजय जाधव यांची पहिली पसंती ही शिंदेंची शिवसेना नव्हती, तर त्यांना थेट भाजपामध्ये प्रवेश करायचा होता, असा दावा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधीमंडळ अधिवेशनात एका चॅनलशी बोलताना केला. संजय जाधव यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा होती, पण पुढे काय झाले? माहिती नाही आणि त्यांना शिवसेनेत जावे लागले, असे बोर्डीकर म्हणाल्या. परभणी लोकसभा मतदारसंघातून तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छूक आहात, पण संजय जाधव यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाने तुमची अडचण झाली आहे का? या प्रश्नावर त्याचा विचार आताच कशाला करायचा? अजून दोन-अडीच वर्ष आहेत, असे म्हणत त्यांना याविषयावर अधिक बोलणे टाळले.
खासदार संजय जाधव यांनी महायुतीत प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यात अधिक वेगाने विकास कामे होतील. महायुती परभणी आणि मराठवाड्यातही भक्कम झाली आहे. खरतर संजय जाधव हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाने प्रभावित झाले होते. ज्या प्रमाणे प्रत्येक पक्षातील आमदार, खासदार, पदाधिकाऱ्याला भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा वाटतो, तसाच संजय जाधव यांनाही भाजपमध्येच यायचे होते. त्यांचा देखील पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रचंड विश्वास आहे. परंतु काही कारणास्तव त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला, असे मेघना बोर्डीकर म्हणाल्या.
परभणी जिल्ह्याच्या राजकारणात बोर्डीकर आणि जाधव यांच्यात फारसे राजकीय सख्य नव्हते. जिल्हा बँकेच्या राजकारणात सत्तेसाठी या दोघांनी जुळवून घेतल्याचे अनेकदा दिसले होते. परंतु जिल्हा आणि राज्य पातळीवरील राजकारणात बोर्डीकर-जाधव हे एकमेकांचे विरोधक म्हणूनच ओळखले जातात. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापुर्वी जिल्ह्याच्या राजकारणात दोघे कायम एकमेकांवर टीका करायचे. परंतु ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आणि विरोधक असलेले संजय जाधव हे भाजपाचे मित्र झाले. आता मनातून कितीही इच्छा नसली तरी राज्य आणि केंद्रातील नेतृत्वापुढे जिल्ह्यात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा नाईलाज झाला असेच सध्याचे चित्र आहे.
मेघना बोर्डीकर यांच्या संजय जाधव यांना शिवसेनेत नाही तर भाजपामध्ये यायचे होते या त्यांच्या दाव्यात सत्यता आहे की मग त्यांच्याकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. जाधव यांच्या महायुतीतील प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात बोर्डीकरांच्या वर्चस्वाला धक्का बसू शकतो. जिल्ह्यात भाजपापेक्षा शिवसेनेची ताकद जास्त आहे, असा दावा खासदार संजय जाधव यांनी नुकताच एका जाहीर कार्यक्रमातून केला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संजय जाधव यांना भाजपामध्ये यायचे होते. हा केलेला दावा जाधव यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.