Parbhani ZP Election 2026 Sarkarnama
मराठवाडा

Parbhani ZP Election 2026 : परभणीत युती-आघाडीचे बारा वाजले, सगळेच स्वबळावर!

Parbhani Zilla Parishad election political update : परभणी जिल्हा परिषद निवडणूक 2026 पूर्वी युती-आघाडी कोलमडली असून सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

Jagdish Pansare

गणेश पांडे

Marathwada Politics : परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत युती-आघाडीसाठी प्रयत्न झाले. पण उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी युती-आघाडीचे अक्षरश: बारा वाजले. सगळ्याच पक्षांनी स्वबळ दाखवत आपापल्या उमेदवारांना बी फॉर्म देत मैदानात उतरवले. त्यामुळे युती-आघाडीचे वस्त्रहरण झाल्याचे चित्र आहे. 53 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एकत्र येण्यापेक्षा 'एकमेकांना दाखवू' हाच नारा सर्वच पक्षांनी दिला आहे.

महापालिकेत यशस्वी ठरलेला काँग्रेस-ठाकरेसेनेच्या युतीचा प्रयोग जिल्हा परिषदेत मात्र पुरता फसला आहे. सत्तेचे मॅजिक फिगर गाठणारी ही जोडी जिल्हा परिषदेत येताच जणू एकमेकांना ओळखायलाच तयार नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, ठाकरेसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यात झालेल्या चर्चांचा फज्जा उडाला. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वबळाचा रस्ता धरत मैत्रीवर राजकीय माती टाकली आहे. कार्यकर्त्यांच्या अपेक्षांवर मात्र या नेत्यांनी पाणी फेरले आहे असेच म्हणावे लागेल.

दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याऐवजी स्वतःच्या ताकदीवर मैदान मारण्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांनी केला आहे. राज्यात सत्तेत असलेली भाजप-शिंदेच्या शिवसेनेची युती मात्र जिल्हा परिषदेत अर्धवट अवस्थेत आहे. केवळ जिंतूर आणि परभणी या दोन विधानसभा मतदारसंघात उशिरा का होईना, दोन्ही पक्षांनी युती केली. मात्र ही युती सर्वत्र नाही, हेच भाजपच्या अडचणी अधोरेखित करते.

गंगाखेडमध्ये भाजपने आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाशी हातमिळवणी करत संपूर्ण मैदान कमळमय केले आहे. गुट्टे गटाचे उमेदवारही थेट भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार असल्याने तेथील राजकारण भाजपच्या बाजूने झुकल्याचे पाहावयास मिळत आहे. पण पाथरी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे सूर अद्याप जुळलेले नाहीत. जिल्हाप्रमुख सईद खान यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात युतीची गाडी पाथरी विधानसभा मतदारसंघात रुतून बसल्याचे चित्र आहे. एकूणच परभणी जिल्हा परिषद निवडणूकीत युतींच्या घोषणा नव्हे, तर मतभेदांचे दर्शनच होत आहे.

अजितदादांची राष्ट्रवादी स्वबळावर..

जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यातील बहुतांश जागा आम्ही स्वबळावर लढविणार आहोत. चारही विधानसभा मतदारसंघांतील गटात पक्षाचे सक्षम उमेदवार मैदानात उतरविले आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता होती आणि आताही तीच स्थिती कायम राहील, असा दावा आमदार राजेश विटेकर यांनी केला आहे.

कुठे युती, कुठे एकला चलो रे..

तर भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी आम्ही पक्षश्रेष्ठीच्या आदेशानंतर जिल्ह्यात शिवसेनेसोबत युती केली आहे. जिंतूर व परभणी विधानसभा मतदारसंघात आमची युती आहे. पाथरी मतदारसंघात बोलणी सुरु आहे. गंगाखेड मतदारसंघात गुट्टे मित्रमंडळ आमच्यासोबत असल्याचे सांगीतले आहे. तर ठाकरेसेने सोबत आमची जिल्ह्यात कुठेही आघाडी झालेली नाही. फक्त हदगाव सर्कलमध्ये आम्ही शिवसेनेसोबत आहोत. उर्वरित ठिकाणी काँग्रेस स्वतःच्या ताकदीवर निवडणुक लढविणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी स्पष्ट केले.

महापालिकेत फटका, म्हणून युती

भाजपसोबत युती फिसकटल्याने आम्हाला परभणी महापालिकेत 20 जागांचा फटका बसला. परंतु आता आम्ही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपसोबत आमची युती केली आहे, असे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे म्हणाले.

काँग्रेसकडून प्रतिसाद नाही

आम्ही काँग्रेससोबत आघाडीसाठी वारंवार चर्चेला बसलो परंतू त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी आमचे नेते खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा परिषदेच्या बहुतांश जांगा या स्वबळावर लढवित आहोत, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. रवींद्र धर्मे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT