Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा, त्यांना मिळालेला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार व या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लावलेली हजेरी याची सध्या देशभरात चर्चा होत आहे. (PM Modi visit In Pune News) ज्या मोदींच्याविरोधात देशपातळीवर विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न `इंडिया`च्या माध्यमातून सुरू आहे, त्याला कुठेतरी पवारांच्या व्यासपीठावरील हजेरीने धक्का बसेल असा सूर विरोधकांनी लावला होता.
शरद पवारांनी (Sharad Pawar) मात्र पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावत पंतप्रधान पदाचा मान तर राखलाच, पण भाषणात मोदींचे कौतुक टाळत आघाडीचा धर्मही पाळल्याचे दिसून आले. उलट पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावरून सर्जिकल स्ट्राईकचा गवगवा करणाऱ्या मोदी (Narendra Modi) आणि त्यांच्या भाजपला इतिहासाचा दाखला देत आरसाही दाखवण्याचे काम पवारांनी केले.
व्यासपीठावर मोदी आणि शरद पवार जेव्हा समोरासमोर आले तेव्हा दोघांमधील हास्यविनोद, पवारांकडून दिलेली टाळी याचे वेगळे अर्थ जरी काढले जात आहेत. (Pune) मात्र ते अर्थहीन आहेत हे पवारांनी आपल्या भाषणातून दाखवून दिले. लोकमान्य टिळकांच्या नावाने दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार मोदींना जाहीर झाला तेव्हापासून विरोधकांकडून टीका केली जात आहे.
आज प्रत्यक्ष मोदींना हा पुरस्कार जेव्हा प्रदान करण्यात आला तेव्हा आयोजकांनी मोदींची निवड का केली? याची कारणे प्रास्ताविकात दिली. आतापर्यंत या पुरस्काराचे मानकरी कोणकोण ठरले? हे देखील सांगितले. मुख्यमंत्र्यांपासून आयोजकांनी सगळ्यांनी मोदींचे तोंडभरून कौतुक केले. शरद पवारांनी मात्र आपल्या काही मिनिटांच्या भाषणात देखील मोदींचा उल्लेख टाळत आपण भूमिकेवर ठाम असल्याचे दाखवून दिले.
लोकमान्य टिळकांचा इतिहास सांगतानाच त्यांच्या निर्भीड आणि दबावविरहित पत्रकारितेचा उल्लेख करत पवारांनी मोदी सरकारला टोला लगावला. देशात माध्यमांची होणारी मुस्काटदाबी याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. मोदींच्या पंतप्रधान काळातील ९ वर्षाच्या कामगिरीचा गवगवा सध्या देशभरात सुरू आहे. यात प्रामुख्याने पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख केला जातो.
पण मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आपण आज करत असलो तरी शिवाजी महाराजांनी असा सर्जिकल स्ट्राईक त्यांच्या काळात याच पुण्यात केला होता याची आठवण देखील त्यांनी करून दिली. दबावरहित पत्रकारिता आणि सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करत पवारांनी एकप्रकारे मोदींवर त्यांच्या समक्षच निशाणा साधला.
भाषणाच्या शेवटी पुरस्कार मिळाल्याबद्दल मोदींचे अभिनंदन करतो हे एक वाक्य सोडले, तर त्यांनी भाषणात मोदींवर बोलणे टाळले. त्यामुळे राज्यातील आणि देशपातळीवरील मोदीविरोधी आघाडीतील पक्षांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.