Shripal Sabnis author Sarkarnama
मराठवाडा

Jalna : राजकीय पक्षांनी स्वार्थासाठी खऱ्या साहित्यिकांऐवजी नकली लोकांना विधान परिषदेत पाठवले..

शरद पवारांवर केतकी चितळेने केलेली कविता विकृतीचे दर्शन घडवणारी क्रूर कविता आहे. ही कविता नसून कारागिरी आहे, अशा पद्धतीने व्यंगाचं भांडवल करणे साहित्यात बसत नाही. (shripal sabnis)

लक्ष्मण सोळुंके

जालना : विधान परिषदेत विद्वान, साहित्यिक, कलाप्रेमी लोकांना पाठवायला हवे, पण प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या स्वार्थासाठी नकली लोकांना राज्यपालांच्या शिफारशीवरून विधान परिषदेत पाठवले, असा आरोप ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केला आहे. (Jalna) राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सारख्या वयस्कर व्यक्तीवर केतकी चितळेने विकृतीचं दर्शन घडवणारी कविता करत कविताच बदनाम केल्याचेही ते म्हणाले.

सबनीस हे जालना जिल्ह्यातील मंठा येथे आयोजित २९ व्या नवोदित मराठी साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. (Marathwada) यावेळी राज्यातील सद्यस्थिती व राजकीय वातावरणावर भाष्य केले. विशेषतः विधान परिषदेत कला, क्रिडा व साहित्य क्षेत्रातून ज्या लोकांना पाठवले जाते याबद्दल त्यांनी तिखट शब्दात नाराजी व्यक्त केली.

सबनीस म्हणाले, राजकीय सोयीसाठी आणि नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी खऱ्या साहित्यिकांना बाजूला सारत कला आणि साहित्याचे नकली आमदार राज्यपालांची शिफारस करून विधान परिषदेत आतापर्यंत पाठवले गेले. मी सोडून विधान परिषदेत कुणालाही नेतृत्व द्यावं म्हणून ही मागणी मी सार्वजनिक पद्धतीने केली आहे.

शरद पवारांवर केतकी चितळेने केलेली कविता विकृतीचे दर्शन घडवणारी क्रूर कविता आहे. ही कविता नसून कारागिरी आहे, अशा पद्धतीने व्यंगाचं भांडवल करणे साहित्यात बसत नाही. कवितेचे माध्यम क्रौर्यासाठी वापरू नये. केतकी चितळे हिने कविता बदनाम केली, अशा शब्दात सबनीस यांनी या कृतीचा निषेध केला. असंही सांगायला सबनीस विसरले नाहीत.

सांस्कृतिक लोकशाही निर्माण करायची असेल तर जिल्ह्या-जिल्ह्यात अशी साहित्य संमेलनं व्हायला हवी, असे आवाहन करतांनाच सध्याची राजकीय परिस्थिती बिघडल्याचे सबनीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत जातीचे आणि धर्माचे रंग आहेत आणि ते गडद आहेत हे आता झाकून राहिलेले नाही. हिंदू धर्मात जन्माला येणे पाप नाही पण हिंदू धर्माचा अतिरेक करून मूळचा शिवाजी महाराजांचा आणि विवेकानंदांचा भगवा अधिक गडद करणे हे मला योग्य वाटत नाही.

मोदींचे हिंदुत्व हे भाजपआणि संघापुरते मर्यादीत आहे त्यामुळे हिंदू राष्ट्राची मागणी वारंवार समोर येत आहे, अशी टीका करतांनाच धर्मनिरपेक्ष संविधान असताना हिंदू राष्ट्राची भूमिका उजागर होत असेल तर या भूमिकेचे कुणीही समर्थन करू शकत नाही असेही ते म्हणाले. परराष्ट्र धोरणातले मोदी मी प्रमाण मानतो पण अंतर्गत राजकारण आणि धर्मकारणातले मोदी माझ्या मतभेदाचा विषय आहेत, असेही सबनीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT