Prakash Abitkar Sarkarnama
मराठवाडा

Prakash Abitkar : नांदेडच्या आरोग्य संवाद यात्रेत मंत्री प्रकाश आबीटकर यांचा कामचूकार अधिकाऱ्यांना दणका; थेट कारवाई!

Nanded Health Department: नांदेडमधील आरोग्य संवाद यात्रेत आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी आरोग्य संस्थांतील त्रुटींवर कारवाईचे आदेश दिले. ११ जणांवर कारवाई, १० जणांची चौकशी आणि चार बदल्यांचे आदेश आहेत.

Jagdish Pansare

Maharashtra Health News: राज्य सरकारचा आरोग्य विभागाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या नांदेड येथील आरोग्य संवाद यात्रेदरम्यान काही अधिकारी-कर्मचारी कामचूकारपणा करत असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या निदर्शनास आले होते. या अकरा अधिकारी-कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. १ नोव्हेंबर २०२६ रोजी आरोग्य संवाद यात्रेच्या पहिल्याच दिवशी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी नांदेड जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना भेटी दिल्या होत्या.

या दौऱ्यात लोहा, मुखेड, हिमायतनगर आणि सोनखेड परिसरातील शासकीय दवाखाने व रुग्णालयांच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली. या पाहणीत आरोग्यसेवेतील त्रुटी, कामकाजातील अनियमितता आणि अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले.आरोग्यसेवा देण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत ११ जणांवर तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

कारवाई झालेल्यांमध्ये ६ डॉक्टर, २ आयडीडब्ल्यू इंजिनिअर, २ जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (DPM), राष्ट्रीय आरोग्य अभियान, २ तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. याशिवाय आणखी १० जणांच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. तसेच चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पैकी चार जणांच्या बदलीचे आदेश देखील देण्यात आल्याची माहिती आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली ३ नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत आरोग्य संवाद यात्रेदरम्यान आढळलेल्या त्रुटी आणि अनियमिततांबाबत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रत्येक अधिकाऱ्याची कामानुसार जबाबदारी निश्चित करून त्याच्या कामाचे नियमित मूल्यमापन करण्यावरही भर देण्यात आला. गरजेनुसार संबंधितांच्या बदलीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागाच्या आढाव्यात प्रामुख्याने पुढील बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले.डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची अनियमित उपस्थिती, रुग्णांना वेळेवर उपचार न मिळणे, औषधे आणि जीवनरक्षक औषधांचा अपुरा साठा. तसेच रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणे बंद असणे, प्रयोगशाळा तपासण्या आणि एक्स-रे सुविधांमधील अडचणी, रुग्णालयांतील स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची समस्या, रुग्णवाहिका सेवा आणि शासकीय आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी आढळून आल्या होत्या. सर्व आरोग्य संस्थांमध्ये २४ तास अत्यावश्यक आरोग्य सेवा उपलब्ध ठेवण्याचे आणि रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगू नये, असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी १ नोव्हेंबरपासून नांदेड येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा ५ डिसेंबर २०२६ पर्यंत चालली.

या यात्रेत आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी प्रत्यक्ष आरोग्य संस्थांना भेटी देऊन रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधला होता. प्रत्येक जिल्ह्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. आरोग्य योजनांचा लाभ प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचतो का? याची तपासणी करण्यात आली होती.

असे आहे कारवाईचे स्वरूप..

कर्मचाऱ्यांवर बदली, सेवा समाप्तीचा प्रस्ताव आणि कारणे दाखवा नोटीस, अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. आरोग्य संवाद यात्रेदरम्यान काही आरोग्य संस्थांमधील कामकाजाबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणांची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यासह संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार ३ नोव्हेंबर रोजी आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यापूर्वी संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. सतीशकुमार सोळंके, आरोग्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्नील सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांच्या पथकाने संबंधित आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली.

चौकशीअंती प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनखेड येथील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या केल्या. लोहा येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच दुधड (ता. हिमायतनगर) आणि काडली उपकेंद्रांतील दोन समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. जिल्हा स्तरावरील कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता यांची सेवा तत्काळ प्रभावाने समाप्त करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि जिल्हा लेखा व्यवस्थापक यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यांच्यावरील पुढील कठोर प्रशासकीय कारवाई राज्य स्तरावरून करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्नील सांगळे यांनी दिली.

आरोग्य सेवांमध्ये हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी दिला. नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे. सेवांमधील दिरंगाई आणि निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT