Maratha Reservation Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : 'सगेसोयऱ्यां'साठी जरांगेंचं पुन्हा उपोषण; तर तरुणानं संपवलं जीवन

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठीचा लढा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू आहे. अंतरवाली ते मुंबईपर्यंत काढलेल्या पदयात्रेला यशही मिळाले. सरकारने सगेसोयरे यांनाही कुणबी प्रमाणपत्र आणि त्याआधारे ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याचे मान्य केले, परंतु या संदर्भातील कायदा करण्यास विलंब होत असल्यामुळे हताश झालेल्या एका 27 वर्षीय तरुणाने शनिवारी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले.

परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या राजवाडी येथील प्रताप शेवाळे याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत 'माझ्या मराठा समाजाला पक्के आरक्षण मिळवण्यासाठी सगेसोयरेचा कायदा पारित होणे आवश्यक आहे. परंतु शासन तो कायदा पारित करत नाही. या कारणामुळे मी आत्महत्या करत आहे,` असे नमूद केले आहे. (Maratha Reservation)

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर कायद्याची अंमलबजावणी व विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी दबाव निर्माण व्हावा म्हणून आजपासून अंतरवाली (Antarwali Sarati) येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्याआधीच प्रताप शेवाळे याने आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होण्याचे प्रमाण मराठवाड्यात वाढले आहे. वारंवार आवाहन करूनही मराठा तरुण टोकाचं पाऊल उचलत असल्याने सरकारविरोधात रोष वाढत आहे.

प्रताप सकाळीच शेजाऱ्याचा डब्बा देण्यासाठी त्यांच्या शेतात जातो, असे सांगून घरातून निघाला होता. पण शेजाऱ्याच्या शेतात न जाता आपल्याच शेतात गेला आणि त्याने झाडाला गळफास लावून घेतला. त्यानंतर सकाळी अकराच्या दरम्यान, शेतावर जाणाऱ्या लोकांना प्रतापचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. दहावीपर्यंत शिकलेला प्रताप शेती आणि छोटा व्यवसाय करायचा. मराठा आरक्षण लवकर मिळावे, यासाठी तो अनेक आंदोलनातही सहभागी झाला होता.

अंतरवाली सराटी येथेही त्याने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सभेला हजेरी लावली होती. जालना ते मुंबई पायी प्रवासातही ताे गावातल्या लोकांसोबत सहभागी झाला होता. सरकारने वाशी येथे मराठा आंदोलकांची भेट घेऊन कुणबी नोंदी सापडलेल्या तसेच सगेसोयरे यांनाही प्रमाणपत्र आणि आरक्षण देण्याची अधिसूचना मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सोपवली होती, पण या निर्णयाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करण्यात आल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी चर्चा होणार आहे. मात्र, सगेसोयरेंना प्रमाणपत्र आणि आरक्षण लागू करण्याच्या अंमलबजावणीला वेळ लागत असल्यामुळे प्रताप याने हे टोकाचे पाऊल उचलले. `एक मराठा, लाख मराठा' असे लिहित प्रताप याने आपले जीवन संपवले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT