Sarkarnama
मराठवाडा

Prataprao Chikhalikar : महाविकास आघाडीत वंचितच्या 'एन्ट्री'ने चिखलीकर पुन्हा 'डेंजर झोन'मध्ये...?

Nanded BJP News : अखेर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी राज्यातील महाविकास आघाडीचा भाग झाली आहे.

Laxmikant Mule

Nanded BJP News : अनेक प्रयत्न, रुसवे-फुगवे, टीका-टोमणे आणि इशारे दिल्यानंतर अखेर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी राज्यातील महाविकास आघाडीचा भाग झाली आहे. आंबेडकरांच्या आघाडीतील समावेशामुळे महाविकास आघाडीची राज्यातील ताकद वाढणार आहे. महायुतीसह त्यांच्या घटक पक्षांशी दोन हात करताना आता महाविकास आघाडीची बाजूही भक्कम होणार आहे. या नव्या समीकरणामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

नांदेड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर 2014 च्या मोदीलाटेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथून विजय मिळवत भाजपला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतरच्या 2019 च्या लोकसभेत अशोक चव्हाण विजयाची पुनरावृत्ती करणार, पण वंचित-एमआयएमच्या आघाडीने त्यांचा खेळ बिघडवला आणि भाजपचे प्रताप पाटील-चिखलीकर विजयी झाले. दरम्यान, गेल्या साडेचार वर्षांतील चिखलीकरांची कामगिरी फारशी समाधानकारक राहिली नाही. (Prataprao Chikhalikar Loksabha Election)

शिवाय त्यांना पक्षांतर्गत विरोधही वाढला होता. अगदी त्यांच्याच पक्षाच्या जिल्ह्यातील आमदारांशी चिखलीकरांचे पटत नव्हते. त्यामुळे भाजपने निवडणुकीपूर्वी केलेल्या अंतर्गत चाचणीत नांदेड लोकसभेची जागा धोक्यात म्हणजेच 'डेंजर झोन'मध्ये असल्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला होता. परंतु राज्यातील भाजपच्या नेत्यांनी गेल्या काही महिन्यांत नांदेडमध्ये लक्ष घातले. स्वतः चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी जिल्ह्याचा दौरा करीत भाजपमधील अंतर्गत गटबाजीला वेसण घातली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार चिखलीकर यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील स्वपक्षीय आमदारांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारत दोन पावलं मागे घेतली. पक्षानेही चिखलीकर यांचा लोकसभेचा मार्ग सुकर करण्यासाठी त्यांना जिल्ह्यात मोकळीक देत बळ दिले. त्यामुळे डेंजर झोनमधील ही जागा आता कुठे सेफ झोनमध्ये आली होती. परंतु प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला सोबत घेत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार धक्का दिला.

याचा परिणाम नांदेड लोकसभा मतदारसंघातही दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चिखलीकर पुन्हा एकदा डेंजर झोनमध्ये जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे झालेल्या मतविभागणीचा फायदा चिखलीकरांना झाला होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव करून चिखलीकर जायंट किलर ठरले होते. वंचित बहुजन आघाडी काँग्रेसबरोबर गेल्याने चिखलीकरांचा खेळ बिघडण्याच्या मार्गावर आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. गेल्या वेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे भारतीय जनता पक्षात होते. त्यांचा चिखलीकरांच्या विजयात खूप मोठा वाटा होता‌. खतगावकर आता स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये आहेत. उमरी, धर्माबाद भागात दिवंगत नेते बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी चिखलीकरांना मताधिक्य मिळवून दिले होते. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपचे (BJP) प्रतापराव पाटील-चिखलीकर, काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि वंचित-एमआयएम आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ. यशपाल भिंगे अशी तिरंगी लढत झाली होती.

भिंगे यांना तब्बल एक लाख साठ हजार मते मिळाली होती. या तिरंगी लढतीत चिखलीकरांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा 41 हजार मतांनी पराभव केला होता. काँग्रेसची पारंपरिक मते वंचितकडे गेल्याचा फायदा चिखलीकरांना झाला. पण आता तोच वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीचा घटकपक्ष झाला आहे. याचा फायदा काँग्रेसला निश्चितच होणार आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता गेल्यावेळी भिंगे यांना मिळालेली सर्वच मते काँग्रेसकडे वळतील, अशी शक्यता कमी आहे. तरीही बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार खासदार चिखलीकरांना निवडणुकीची तयारी करून आपली जागा सेफ करावी लागणार आहे.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT