Sambhaji Patil Nilangekar Sarkarnama
मराठवाडा

Sambhaji Patil Nilangekar : आमदार निलंगेकरांच्या रॅलीला दाखवले काळे झेंडे; जलसाक्षरता रॅली दरम्यान उडाला गोंधळ

Latur Political : आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची सध्या जलसाक्षरता रॅली सुरू आहे.

राम काळगे

Latur News: आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची सध्या जलसाक्षरता रॅली सुरू आहे. पण त्यांच्या या जलसाक्षरता रॅलीला निषेधाचा सामना करावा लागला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजबांधवांनी शासकीय, राजकीय कार्यक्रमांवर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.

यातच आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी या रॅलीला काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. त्यानंतर मराठा आरक्षणाला आपलाही पाठिंबा असल्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आंदोलकांना सांगितले.

शुक्रवारी जलसाक्षरता अभियान रॅली अहमदपूर तालुक्यात दाखल झाली. ती हाडोळती येथे सायंकाळी साडेपाच वाजता पोहोचली. तेव्हा तेथे जमलेल्या दोनशे ते तीनशे मराठा समाजबांधवांनी एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले.

त्यामुळे या ठिकाणी काही वेळ एकच गोंधळ उडाला. यानंतर आमदार निलंगेकर यांच्यासह त्यांच्यासोबत आलेले भाजप प्रवक्ते गणेश हाके, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक केंद्रे, प्रेरणा होनराव यांना हे अभियान गुंडाळावे लागले.

ही रॅली सायंकाळी शिरुर ताजबंद येथे दाखल झाली. यावेळी सकल मराठा समाजबांधवांतर्फे काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणताही राजकीय कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शिरुर ताजबंद येथील आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नाना कदम, सकल मराठा समाजाचे शिवानंद भोसले, बांधकाम सभापती युवराज पाटील, शिवशंकर लांडगे, बसव ब्रिगेडचे सिद्धेश्वर औरादे आदी उपस्थित होते.

आमदार निलंगेकर नेमकं काय म्हणाले ?

आमदार निलंगेकर यांनी मराठा आरक्षणाला पाठींबा असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, अशा घोषणा देऊन ते अहमदपूरच्या दिशेने रवाना झाले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT