Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसह महायुती बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळालं. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये तर भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांचा धुवा उडाला. मराठवाड्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या महायुती मधील पक्षांच्या उमेदवाराचा पराभव होण्यामागे महत्वाचे कारण मनोज जरांगे यांचे मराठा आंदोलन फॅक्टर असल्याचे बोलले जाते.
मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महाविकास आघाडीला कौल देत महायुतीला नाकारल्याचं चित्र पाहायला मिळालं. मराठवाड्यामध्ये 'जरांगे फॅक्टर'चा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बसल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत या फॅक्टरला काउंटर करण्यासाठी भाजपकडून वेगवेगळ्या रणनीती आखण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी भाजपने एका मराठा नेत्याला मैदानात उतरवण्याचे निश्चित केले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जालनामधून आंदोलनाला सुरुवात केली. आंतरवली सराटीत त्यांनी उपोषण सुरू असताना उपोषणस्थळी लाठीमार झाला आणि हे आंदोलन राज्यभर पसरले. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. जरांगे यांच्या आंदोलन इफेक्टमुळे बीडमधून पंकजा मुंडे तर जालन्यामधून रावसाहेब दानवे यासारख्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.
मराठवाड्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठे यश मिळाले. जालन्यामध्ये काँग्रेसचे कल्याण काळे, काँग्रेस शिवाजीराव काळगे (लातूर), नांदेडमधून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण, हिंगोली ठाकरे गटाचे नागेश पाटील, धाराशिव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर, परभणी ठाकरे गटाचे संजय जाधव यांनी विजय केला.
विधानसभा निवडणुकीत देखील अशाच प्रकारचे संकटाचे ढग मराठवाड्यामध्ये महायुती आणि भाजपसाठी घोंगावत आहेत. हे काउंटर करण्यासाठी भाजपने आता या भागामध्ये मराठा नेत्यांना उतरवण्यास सुरुवात केली आहे.त्यानुसार पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर मराठवाड्यातील सहा विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर मराठा नेतृत्व म्हणून मुरलीधर मोहोळ यांना पुढे आणण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा पाहायला मिळत आहे. आता मराठवाड्यातील महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर वरिष्ठ नेतृत्वाने सोपवली आहे. ज्या विधानसभा मतदारसंघाचे जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने लातूर आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आहेत.
या मतदारसंघांमध्ये सध्या महाविकास आघाडी ही पॉझिटिव्ह झोनमध्ये आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात कष्ट मुरलीधर मोहोळ यांना घ्यावे लागणार आहेत. या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी एका मराठा नेत्याकडे देण्याचा भाजपची डाव किती यशस्वी ठरणार हे भविष्यात पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.