Raosaheb Danve-Dr.Bhagwat Karad
Raosaheb Danve-Dr.Bhagwat Karad Sarkarnama
मराठवाडा

कराडांच्या हट्टापुढे दानवे नमले ; शंभर कोटी खर्चून औरंगाबादेतही होणार रेल्वे पीट लाईन..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : गेल्या २३-३० वर्षापासून औरंगाबादेत रेल्वे पीट लाईन व्हावी, यासाठी विविध रेल्वे संघटना, राजकीय नेत्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला. परंतु मराठवाड्याबद्दल आकस बाळगून असलेल्या रेल्वेतील दक्षिणात्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागा, खर्च आणि विविध कारणे सांगून पीट लाईनची मागणी धुडकावून लावली होती. (Aurangabad) देशाच्या इतिहासात मराठवाड्याला पहिल्यांदा केंद्रात रेल्वे खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाले, त्यामुळे औरंगाबादकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी औरंगाबादच्या हक्काची पीट लाईन आपल्या जालना मतदारसंघात नेली आणि पुन्हा एकदा औरंगाबादकरांवर अन्याय झाल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली.

विशेष म्हणजे केंद्रात अर्थ राज्यमंत्री पदावर वर्णी लागलेले औरंगाबादचे डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी रेल्वे पीट लाईनसाठी आपली शक्ती पणाला लावली होती. परंतु राजकारणात आपल्यापेक्षा ज्येष्ठ आणि अनुभवी असलेल्या दानवेंपुढे त्यांनी माघार घेतली. रेल्वे पीट लाईन पळवल्यामुळे दानवेंवर औरंगाबादकरांची देखील नाराजी होती. अखेर डाॅ. कराडांचा हट्ट आणि औरंगाबादकरांच्या नाराजीपुढे नमते घेत रावसाहेब दानवे यांनी दुसरी रेल्वे पीट लाईन औरंगाबादमध्ये करणार असल्याची घोषणा केली.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोलापूर-धुळे महामार्गासह अन्य प्रक्लपांचे लोकार्पण व भुमीपूजन औरंगाबादेत पार पडले. यावेळी केंद्रातील मराठवाड्यातील दोन्ही मंत्री कराड, दानवे उपस्थित होते. कराड यांच्या भाषणानंतर दानवे यांचे भाषण झाले आणि त्यांनी शंभर कोटी रुपये खर्चून औरंगाबादेत दुसरी पीट लाईन केली जाणार असल्याचे जाहीर केले. रावसाहेब दानवे केंद्रात रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडून मराठवाड्याला खूप अपेक्षा आहेत.

अनेक वर्ष रखडलेले रेल्वे प्रश्न त्यांनी मार्गी देखील लावले आहेत. रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, विद्युतीकरण अशा अनेक गोष्टींना आता वेग आला आहे. रेल्वेची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठीची पीट लाईन औंरंगाबादमध्ये करावी ही मागणी खूप वर्षांपासून होत होती. ही पीटलाईन झाली की मराठवाड्यातून जाणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढून रेल्वेचे जाळे देशभरात विस्तारण्यास मदत होणार आहे. पीट लाईन मंजुर झाली पण दानवे यांनी ती आपल्या राजकीय फायद्यासाठी जालन्यात नेली.

त्यामुळे डाॅ. कराड नाराज झाले होते, त्यांनी आपली नाराजी बोलून देखील दाखवली. परंतु दानवेंना त्यांनी विरोध केला नाही. पण कराड व औरंगाबादकरांच्या मनात ही सल कायम असल्याची जाणीव दानवे यांना होती. शिवाय दानवेंच्या जालना लोकसभेचा बराच भाग हा औरंगाबाद जिल्ह्यात देखील येतो. त्यामुळे २०२४ मध्ये ही नाराजी नको, म्हणून दानवे यांनी औरंगाबादेत दुसरी पीट लाईन करण्याची घोषणा केल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT