Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
मराठवाडा

येत्या चार मेनंतर मी कुणाचेही ऐकणार नाही; अभी नही; तो कभी नही : राज ठाकरे आक्रमक!

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : येत्या तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला कोणतेही विष कालावयचे नाही. पण, मशिदीवरील भोंग्यासंदर्भात चार तारखेपासून मी कुणाचेही ऐकणार नाही. ज्या मशिदींवर भोंगे आहेत, त्यांच्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावलीच पाहिजे. विनंती करून तुम्हाला कळत नसेल, तर आमच्यासमोर दुसरा पर्याय उरत नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यासंदर्भात राज्य सरकारला पुन्हा दिला. (Raj Thackeray's aggressive role again regarding the loudspeakrs on mosques)

औरंगाबादमधील जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, मशिदीवरील भोंगे हा धार्मिक विषय नाही, तो सामजिक विषय आहे. लाउडस्पीकर या विषयाला धार्मिक वळण देणार असाल, तर त्याचं उत्तरही आम्हाला धर्मानेच द्यावे लागेल, हेही लक्षात ठेवा. आमची इच्छा नसतानाही आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. महाराष्ट्राची शांतता आम्हाला बिघडवायची नाही. आमची तशी इच्छा आणि गरजही नाही. पण, उत्तरप्रदेशातील भोंगे उतरवले जाऊ शकतात. तर महाराष्ट्रातील भोंगे का उतरवले जाऊ शकत नाहीत, असा सवालही राज ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केला.

सर्वच लाउडस्पीकर हे अनधिकृत आहेत. राज्यातील किती मशिदींकडे लाउडस्पीकसंदर्भात स्थानिक पोलिसांची परवानगी आहे. औरंगाबादमध्ये सहाशे मशिदी आहेत. येथे काय बांगेची स्पर्धा चालते का. संपूर्ण देशातील लाऊडस्पीकर खाली उतरवले पाहिजेत. प्रत्येक वेळी आम्हीच का भोगायचे. आम्हाला सभा घ्यायची म्हटले की नियम सांगितले जातात. पण, त्यांना काय नियम आहेत का नाहीत. तुम्ही रस्त्यावर येऊन नमाज पडता, हे अधिकार तुम्हाला कोणी दिले? असेही राज ठाकरे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचा दाखला काहीजण सध्या देत आहेत. पण (तेवढ्यात बांग सुरू होते) सभेच्या वेळी हे बांग देणार असतील, त्यांना बंद करायला सांगावे. हे सांगून ऐकणार नसतील, तर त्यानंतर महाराष्ट्रात काय होईल, ते मला माहिती नाही. ते सरळ सांगून ऐकत नसतील, तर एकदा होऊन जाऊद्याच. सगळ्या धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवले पाहिजेत. पण, अगोदर मशिदीवरील भोंग उतरवा आणि मगच मंदिरावरील भोंगे काढा, त्यामुळे ‘अभी नही; तो कभी नाही,’ अशी भूमिकाही राज ठाकरे यांनी यावेळी मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT