Raju Shetty Sarkarnama
मराठवाडा

Raju Shetty : सरकार शेतकऱ्यांचे खुनी...! राजू शेट्टी कडाडले

सरकारनामा ब्यूरो

शीतल वाघमारे

Dharashiv Political News :

शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी संतप्त झाले आहेत. त्यांनी धाराशिवमध्ये ट्रॅक्टर रॅली काढून सरकारचा निषेध केला. शिवाय सरकार शेतकऱ्यांचे मारेकरी असल्याचा गंभीर आरोप केला.

राज्यात सहा महिन्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येत अडीच टक्के वाढ झाली आहे. या आत्महत्या म्हणजे सरकारी धोरणाचा परिणाम असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. एवढेच नाही, तर केंद्र आणि राज्य सरकारच्या हाताला शेतकऱ्यांचे रक्त लागल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे.

शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी धाराशिव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. त्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या सभेत राजू शेट्टी यांनी सरकारचे वाभाडे काढले.

शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे, ही प्रमुख मागणी घेऊन, तसेच पीकविमा, दुष्काळ, सोयाबीन आणि कांद्याचे दर हे सर्व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन 'स्वाभिमानी'च्यावतीने ट्रॅक्चर मोर्चा काढला. 'सरकारने जनाची नाही मनाची लाज बाळगून तरी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष द्यावे,' असा टीकेचा असूड राजू शेट्टी यांनी सरकावर ओढला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एका बाजूला सरकार दुष्काळ जाहीर करते पण, विमा कंपन्याना शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे द्यायला आदेश देत नाही. विमा कंपन्या यांच्या जावयांच्या आहेत का? एवढे लाड या विमा कंपन्यांचे का? असा सवाल राजू शेट्टी यांनी सरकारला विचारला.

विमा कंपन्या शेतकऱ्यांना दारात उभे करीत नाहीत. निसर्गाच्या तडाख्यातून उरलेल्या पिकाला भाव नाही. कांद्याला बरा पैसा मिळत होता. एखाद्या शुभकार्यासाठी जात असताना काळे मांजर अडवत जाते तसे सरकार काळ्या मांजराच्या रूपात आडवे आले आणि कांदा निर्यातीवर बंदी घातली. यामुळे कांद्याचेही वाटोळे झाले आणि शेतकऱ्यांचेही, अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केली.

शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, हा मोठा प्रश्न आहे. सरकारने खताच्या किमती तेवढ्याच ठेवल्या, परंतु त्या किमतीत कमी खत मिळते. येणाऱ्या काळात रासायनिक खतांची 40 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे.

मागील 24 वर्षांमध्ये पिकाचे भाव आहेत तेच राहिले, पण खत आणि उत्पादनाचा खर्च चौपटीने वाढला आहे. सरकारकडून कर्जाच्या पुनर्गठनाचे आदेश न आल्याने कर्जवसुलीसाठी बँका शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावत आहेत, याकडे राजू शेट्टी यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधानांचे लाडके उद्योगपती गौतम अदानी यांनी मोठ्या प्रमाणात पाम तेल आयात केल्याने सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. अदानींसाठी आयात कर पाच टक्क्यांनी कमी केला. त्यामुळे सगळ्या तेलाच्या दरावर परिणाम झाला.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

1. सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कर्जमुक्त करावा

2. कांद्यावरची निर्यातबंदी उठवावी

3. दुधाला योग्य तो भाव द्यावा

4. शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या आधारित दीडपट हमीभाव द्यावा

5. वन्यप्राण्यांच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी अनुदानित कुंपणासाठी योजना राबवावी

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT