Minister Tanaji Sawant-Rana Patil News, Osmanabad
Minister Tanaji Sawant-Rana Patil News, Osmanabad Sarkarnama
मराठवाडा

Ranajagjeetsinh Patil News : राणा पाटलांनी पालकमंत्र्यांची तक्रार थेट प्रधान सचिवांकडे केली..

सरकारनामा ब्युरो

Osmanabad : राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या पण जिल्हा पातळीवर एकमेकांमध्ये वाद असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्री आमदारांमधील वाद आता चव्हाट्यावर येवू लागले आहेत. राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याविरोधात पैठण मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यात देखील असाच प्रकार समोर आला आहे.

तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील (Ranajagjeetsinh Patil) यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे जिल्हानियोजन समितीच्या निधीचे वाटप नियमानूसार करत नसल्याची तक्रार थेट नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. १३ फेब्रुवारी रोजी राणा पाटील यांनी या संदर्भातील पत्र आणि निधीवाटपात केलेला भेदभाव याच्या पुराव्यांच्या यादीसह मंत्रालयात पाठवले.

या पत्राची तातडीने दखल घेत प्रधान सचिव कार्यालयाने उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मुद्देनिहाय सविस्तर माहिती पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राणापाटील विरुद्ध सावंत असा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. नुकत्याच झालेल्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राणापाटील यांनी शिंदे गटाच्या जिल्ह्यातील आमदार, मंत्र्यांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप पालकमंत्री सावंत यांच्याकडून करण्यात आला होता.

शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी राणापाटील यांच्यावर सोपवण्यात आली होती. पण शिंदे गटाला विश्वासात न घतेल्यामुळे भाजप उमेदवाराचा पराभव झाला, असा आरोप देखील करण्यात आला होता. हा वाद ताजा असतांनाच आता पालकमंत्र्यांवर निधी वाटपात भेदभाव केला जात असल्या आरोप आणि त्याची थेट प्रधान सचिवांकडे तक्रार केल्याने राणा पाटील- तानाजी सावंत यांच्यातील दरी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रा. तानाजी सावंत यांना आरोग्य मंत्री करण्यात आले. तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्यावरच जबाबदारी देण्यात आली. सावंत हे सगळा निधी आपल्याच मतदारसंघात देत असल्याचा आरोप काही महिन्यांपुर्वी करण्यात आला होता. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस या चारही पक्षांच्या तसेच स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना देखील सांवत झुकते माप देत नसल्याचा आरोप करण्यात आला होता.

पण सावंत यांच्याविरोधात कुणीही जिल्ह्यात आवाज उठवायला तयार नव्हते. आमदार राणापाटील यांनी मात्र सावंत यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान दिले आहे. डीपीडीसीमध्ये निधी वाटपासाठी जे नियम, निकष शासनाने घालून दिले आहेत, ते पायदळी तुडवत निधीचे वाटप केले जात असल्याचे राणा पाटील यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्याचे पुरावे म्हणून विविध कामांची यादी देखील जोडली आहे. आता जिल्हाधिकारी यांची सविस्तर माहिती प्रधान सचिवांना पाठवणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT