Raosaheb Danve-Chandrakant Khaire
Raosaheb Danve-Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

म्हणे गॅस लाईनसाठी नगरसेवक असतांना निवदेन दिले होते; दानवेंकडून खैरेंची खिल्ली

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : हरिभाऊ बागडेंनी सांगितल की वीस वर्ष खासदार असलेले एकही विकास काम सांगू शकत नाहीत. पण त्यांनी वर्तमानपत्र वाचले की नाही मला माहित नाही, पण आज भुमीपूजन होत असलेली गॅस पाईपलाईन आणि मी पुण्याला सुरू केलेली रेल्वे म्हणे त्या माजी खासदारांमुळेच आली, असा दावा त्यांनी केला आहे.(Chandrakant Khaire) तेव्हा आपल्या लोकांनी जरा पेपर वाचत जा, असा चिमटा काढत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवसेनेचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना टोला लगावला.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंह पुरी यांच्या अनुपस्थितीत पीएनजी गॅस प्रकल्पाचे भुमीपूजन केंद्रातील दोन राज्यमंत्री डाॅ. कराड आणि दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. (Bjp) यावेळी आमदार हरिभाऊ बागडे यांच्यानंतर भाषण केलेल्या रावसाहेब दानवे यांनी देखील खैरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

हरिभाऊ बागडे यांच्या विधानाचा संदर्भ देत दानवे म्हणाले, माजी खासदाराने वर्तमानपत्रातून टीका केली आहे. आज भुमीपूजन होत असलेली गॅसची पाईपलाईन कराडांमुळे नाही तर ते नगरसेवक असतांना त्यांनी तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री सुरज बर्नाला यांना निवेदन दिले होते आणि म्हणून आज ही गॅस पाईपलाईन होत आहे, असा त्या माजी खासदारांचा दावा आहे. आता ते किती वयाचे होते, कुठे राहत होते देवालाच माहित.

मी पुण्यासाठी रेल्वे सुरू केली. बसने आठशे रुपये लागायचे, आम्ही नवीन कोच बसवले, स्टेशनची संख्या कमी केली, सीसीटीव्ही लावले आणि पुण्याला रेल्वे सुरु केली. तर हे माजी खासदार म्हणतात ही रेल्वे ममता बॅनर्जीमुळे सुरू झाली. कारण त्या मंत्री असतांना मी लोकसभेत ही मागणी केली होती. तेव्हा आपल्या लोकांनी पेपर वाचत चला म्हणजे आपल्याला कुणी काय केले हे कळेल?असा उपरोधिक सल्ला देखील दानवे यांनी यावेळी दिला.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, कधी काळी गॅस हा प्रतिष्ठेच लक्षण समजला जायचा, खासदारांना वर्षाला २५ गॅस कूपन मिळायचे, ते घ्यायला आमच्या घरासमोर दररोज पन्नास लोकांची रांग लागायची. पाच हजार रुपयांना गॅस कनेक्शन मिळत होते.

देशाच्या पंतप्रधान एक महिला होऊन गेल्या पण त्यांना देखील महिलांची अडचण लक्षात आली नाही. पण केंद्रात मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकार आले आणि आम्ही गावखेड्यातल्या महिलेच्या डोळ्यात जाणारा धूर, प्रदूषण दूर करण्यासाठी शंभर रुपयात गॅस देण्याची योजना आणली.

मोदीजींनी कोरोनाच्या संकटात गरिबांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ दिला. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रातील सरकार झटत आहे. मराठवाड्याचा चोहोबाजूंनी विकास व्हावा यासाठी रेल्वेचे विद्युतीकरण, दुहेरीकरण, रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून राज्यातील रेल्वे प्रश्नांसाठी आतापर्यंत फक्त ११०० कोटी रुपये बजेटमधून मिळायचे, पण मोदी सरकारने आता ते ११ हजार कोटींवर नेले आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या विकासासाठी मी आणि डाॅ.कराड हे सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि राहू, असा विश्वास देखील दानवे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT