Chandrakant Khaire-Danve-Bhumre  News, Aurangabad
Chandrakant Khaire-Danve-Bhumre News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : दानवे चकवा अन् भुमरे बोका ; खैरेंनी उडवल्ली खिल्ली..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. या सभेत नेत्यांनी केलेली भाषणं सध्या चर्चेचा विषय बनली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे छोटेखानी भाषण आणि त्यात त्यांनी भुमरे यांचा बोक्या म्हणून केलेला उल्लेख यांची चर्चा चांगलीच होवू लागली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी दानवे यांनी भुमरेंचा बोक्या अशा केलेल्या उल्लेखाची चांगलीच खिल्ली उडवली.

प्रसार माध्यमाशी बोलतांना खैरे म्हणाले, आता मी देखील भुमरेंना बोक्याच म्हणणार. दानवे यांनी भुमरेंचा बोक्या उल्लेख केल्यानंतर मला त्यांच्या मतदारसंघातून मला अनेक कार्यकर्त्यांनी फोन करून या नव्या उपाधीचा उल्लेख केला. (Aurangabad) रावसाहेब दानवे यांना देखील त्यांच्या मतदारसंघात चकवा म्हटले जाते. त्यामुळे आता दानवे चकवा आणि भुमरे बोका असल्याचे म्हणत खैरेंनी खिल्ली उडवली.

पैठण येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेवर आणि तिथे नेते, मंत्र्यांनी केलेल्या भाषणावर शिवसेनेकडून सध्या जोरदार टीकास्त्र सोडले जात आहेत. चंद्रकांत खैरे त्यात आघाडीवर आहे. मुख्यमत्र्यांच्या सभेला जमलेली गर्दी तीनशे ते पाचशे रुपये देवून जमवण्यात आली होती, मुख्यमंत्र्यांच्या भाषणात दम नव्हता, अशी टीका केल्यानंतर आता त्यांनी दानवेंचा चकवा आणि भुमरेंचा बोका असा उल्लेख केला.

रावसाहेब दानवे यांनी काल भाषणात शिंदे गटातील आमदार, मंत्र्यांवर शिवसेनेकडून होत असलेल्या टीकेचा उल्लेख केला होता. खाऊन खाऊन माजलेत बोके, पन्नास खोके, पन्नास खोके अशा घोषणा शिवसैनिकांकडून दिल्या जातात. गणेशोत्सवात तर या घोषणांनी सगळ्यांचे लक्ष वेधले होते.

याचाच उल्लेख भाषणात करतांना ` आमच्या पैठणचा बोक्या म्हणजेच संदीपान भुमरे हे खोक्यांना विकले जाणार नाहीत, याचा विश्वास त्यांच्या मतदारसंघातील जनतेला असल्याचा उल्लेख केला. त्यानंतर दानवेंनी भुमरेंचा उल्लेख बोक्या केल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. खैरेंनी नेमकं यावरूनच दानवेंचा चकवा आणि भुमरेंचा बोका असा उल्लेख करत खिल्ली उडवली. आता खैरेंच्या या टीकेला दानवे काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT