औरंगाबाद : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काल (ता.२३) रोजी औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. (Aurangabad) या मोर्चाला चांगली गर्दी जमली होती. क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर पैठणगेट येथून फडणवीस उघड्या जीपमध्ये चढले आणि मोर्चात सहभागी झाले. यावेळी त्यांच्या सोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, (Raosaheb Danve) अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, आमदार अतुल सावे हे देखील होते.
फडणवीस मोर्चात सहभागी झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढला. गुलमंडी, औरंगपुरा मार्गे निघालेल्या मोर्चात फडणवीसांना पाहण्यासाठी प्रचंड रेटारेटी सुरू झाली. त्यामुळे बराच वेळ गाड्यांचा ताफा आणि मोर्चा एकाच ठिकाणी थबकला. (Bjp) पदाधिकारी मार्ग काढून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत होते, पण गर्दी काही ऐकायला तयार नव्हती. तेव्हा अचानक रावसाहेब दानवे जीपमधून खाली उतरले, हातात भाजपचा झेंडा घेतला आणि त्या झेंड्यानेच त्यांनी फडणवीस उभे असलेल्या जीप समोरील गर्दीला मागे लोटले.
दोन्ही बाजूच्या गर्दीला झेंड्याच्या दांड्याने दानवेंनी मागे सारत फडणवीसांचा मार्ग मोकळा करून दिला. पंधरा ते वीस मिनिट दानवे ही कसरत करत होते. पण त्यांचे हे रांगडे रुप पाहून उपस्थितांना त्यांचे भलतेच कौतुक वाटले. केंद्रात रेल्वे मंत्रालया सारख्या महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्री असलेले दानवे पदाचा बडेजाव न दाखवता एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे रस्त्यावर उतरले आणि मोर्चाला मार्ग करून दिला. सध्या दानवे यांच्या या अनोख्या करामतीची व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रावसाहेब दानवे यांच्या साधेपणाचे, जमिनीवर असण्याचे आणि पक्षासाठी काहीही करण्याची तयारी असण्याच्या त्यांच्या कार्यकर्ता वृत्तीचे यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. रावसाहेब दानवे हे देशभरात आपल्या ग्रामीण शैली, पेहराव, भाषा आणि साधेपणासाठी ओळखले जातात. भर सभेत आपला फाटलेला शर्ट दाखवणे असो की, मग दौऱ्यात रस्त्याच्या केडला गाडी उभी करून उपरणे अंथरून त्यावर भाजी भाकरी खाणे असो.
त्यांच्या समर्थकांना दानवेंचा हा मोकळा स्वभावच अधिक भावतो. त्यामुळे काल मोर्चा पुढे सरकत नाही हे लक्षात येताच दानवे यांच्यातील कार्यकर्ता जागा झाला आणि थेट रस्त्यावर उतरला. दानवे यांच्या या कृतीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.