Haribhau Bagde, Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : नाना राजकारणात नाही याची चिंता; पण चांगला पर्याय देऊ..

सरकारनामा ब्युरो

नवनाथ इधाटे

Political News : राजस्थानचे राज्यपाल झाल्यानंतर पहिल्यांदाच मतदारसंघाचा दौरा करणाऱ्या हरिभाऊ बागडे यांचा तालुक्यातील जनतेने सत्कार केला. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सत्कार सोहळ्यात दानवे यांनी नाना आता राजकारणात नाहीत याबद्दल चिंता वाटते, पण त्यांच्या मतदारसंघात चांगला पर्याय देऊ, असे म्हणत इच्छुकांच्या भावनांना हात घातला. नाना म्हणजे कार्यकर्ता घडवणारी फॅक्टरी आहेत. नेकिने काम केल्याचे फळ त्यांना राज्यपाल पदापर्यंत घेऊन गेले, असे गौरवोद्दगार दानवे यांनी यावेळी काढले.

हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांचा राज्यपाल झाल्याबद्दल आणि शनिवारी त्यांच्या वाढदिवस असल्याने मतदारसंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील सगळे भाजप इच्छुक व्यासपीठावर हजर होते. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी नानांचे कौतुक करतानाच त्यांनी पक्षासाठी घेतलेल्या मेहनतीची आठवण भाजप पदाधिकाऱ्यांना करून दिली. (Raosaheb Danve News)

फुलंब्री विधानसभा मतदारसंघ नानांच्या नावाने ओळखला जातो. अत्यंत कष्टाने त्यांनी तो बांधला आहे. तुमच्या सगळ्यांच्या पाठबळ, सदिच्छांमुळे नानांना मोठी जबाबदारी मिळाली. राजस्थानच्या राज्यपालपदी त्यांची झालेली नेमणूक ही त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची पावती आणि त्यांच्या योग्य सन्मान असल्याचे दानवे म्हणाले.

नाना राज्यपाल झाल्यामुळे आता राजकारणात नसणार यांची चिंता आहेच. पण त्यांच्या या मतदारसंघात निश्चित चांगला पर्याय पक्षाकडून दिला जाईल. नाना राजकारणात नसले तरी फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील कोणताच निर्णय त्यांना विचारल्याशिवाय घेतला जाणार नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

नानांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात मतदारसंघात केलेली विकास कामे तुमच्या आयुष्यभर लक्षात राहतील, असेही दानवे म्हणाले. राजकारणात आणि विशेषतः भारतीय जनता पक्षात एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे आपलं काम करत राहिले पाहिजे. कसली अपेक्षा न ठेवता काम करणारा कार्यकर्ता कधी वरिष्ठ नेत्यांच्या नजरेतून सुटत नाही. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, पण म्हणून मी घरात बसून नाही राहिलो, तेव्हापासून सातत्याने बाहेर फिरतो आहे. लोकांच्या भेटीगाठी, कार्यकर्त्यांना हिंमत देऊन विधानसभेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करत असल्याचे दानवे म्हणाले.

माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या रेल्वेचा 174 किलोमीटरचा मार्ग मंजूर झाला. या रेल्वे मार्गामुळे जालना, बदनापूर, सिल्लोड, सोयगाव या चारही मतदारसंघातून रेल्वे जाणार आहे, याचा रावसाहेब दानवे यांनी आवर्जून उल्लेख केला. शेवटी तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. आज तुम्ही सगळ्यांनी साथ दिली म्हणून नाना राज्यपाल पदापर्यंत पोहचू शकले, असेही दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT