Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद जनता सहकारी बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा झटका दिला आहे. बँकेच्या सात संचालकांना तात्काळ पदावरून हटवण्याचे निर्देश आरबीआयने दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. केवळ उस्मानाबाद जनता सहकारी बँकच नाही तर नाशिक, अमरावती येथील काही बँकांवरही आरबीआयने दंडात्मक कारवाई केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानूसार रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. बँकिंग नियमन कायद्यामधील वैधानिक तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पिराजी बापूराव मंजुळे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने २ एप्रिल २०२६ रोजी महत्त्वपूर्ण आदेश दिले होते.
रिझर्व बँकेने औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार संबंधित संचालकांना लेखी किंवा प्रत्यक्ष सुनावणीद्वारे बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र त्यांनी कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे सादर केली नाहीत. प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित न राहिल्याने उपलब्ध कागदपत्रे आणि जुन्या निवेदनाचा अभ्यास करून रिझर्व बँकेचे जनरल मॅनेजर यांनी १ जून २०२६ रोजी हे अंतिम आदेश जारी केले आहेत.
या कारवाईमुळे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सहकार क्षेत्रातील नेत्यांना झटका बसला आहे. या शिवाय आरबीआयने, आरबीआय कायदा 1934 नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करत सेक्शन 45-IA(6) नूसार देशातील १३५ नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांचा परवाना रद्द केला आहे.
तर, आरबीआयकडे १३ नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून त्यांचे परवाने परत करण्यात आले आहेत. आरबीआयने नाशिक जिल्ह्यातील लोकनेते आर.डी. (अप्पा) क्षीरसागर सहकारी बँक लिमिटेड, निफाड या बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध वाढवले आहेत. आरबीआयने या बँकेवर १५ डिसेंबर २०२५ रोजी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निर्बंध घातले होते. या निर्बंधांचा कालावधी १६ जून पर्यंत होता. हे निर्बंध आणखी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी वाढवण्यात आले आहेत. आरबीआयकडून ४ जूनला एक आदेश जारी करत द अमरावती मर्चंटस सहकारी बँक लिमिटेड, अमरावती या बँकेला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आरबीआयने, संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कर्जासंदर्भातील निर्देशांचे पालन न केल्याने ही कारवाई केली आहे. आरबीआयने बँकिंग नियमन कायदा 1949 च्या आधारे ही कारवाई केली आहे. या बँकेने संचालकांना कर्ज मंजूर केल्याचा ठपका आरबीआयने ठेवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.