Central State Finance Minister
Central State Finance Minister Sarkarnama
मराठवाडा

चूल, सरपण व सायकलची प्रतिकृती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.कराड यांनी नाकारली

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः महागाईचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेस ओबीसी सेलच्या वतीने देण्यात आलेली चूल, सरपण व सायकलची प्रतिकृती स्वीकारण्यास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी नम्रपणे नकार दिला. देशातील वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल, गॅसचे वाढलेले भरमसाठ भाव पाहता लोकांना आता पुन्हा चूल आणि सायकलीकडे वळावे लागत असल्याचे म्हणत राष्ट्रवादीच्या वतीने कराड यांना ही प्रतिकृती भेट देण्यात आली होती.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष मनोज घोडके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने डाॅ. कराड यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवदेन दिले.

हे निवेदन देत असतांनाच देशातील वाढत्या महागाईकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घोडके यांनी चूल, सरपण आणि सायकलची प्रतिकृती कराड यांना भेट म्हणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र कराड यांनी प्रतिकृती स्वीकारण्यास नकार देत केंद्राकडे महागाई कमी करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवदेनात म्हटले आहे की, २०११ साली सामाजिक व आर्थिक अंगाने करण्यात आलेल्या जातनिहाय गणनेचा ९९ % तपशील अचूक असल्याचे जनगणना आयुक्तांनी २०१६ साली संसदेच्या ग्रामीण विकासाशी संबंधित स्थायी समितीला कळविले होते. मात्र जातनिहाय गणनेचा तपशील वापरण्यास अयोग्य आहे असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

केंद्र सरकारने त्यांच्याकडे असलेला इम्पिरिकल डेटा त्वरित उपलब्ध करून द्यावा याकरिता आपण ओबीसी मंत्री म्हणून पुढाकार घ्यावा. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणास ओबीसी असल्यानेच मंत्रिपद दिले आहे. आपण या संधीचे सोने करून ओबीसींवर होत असलेल्या अन्यायावर लोकसभेत आवाज उठवावा तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून दररोजच्या पेट्रोल डिझेल व गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे, याची जाणीव पंतप्रधानांना करून द्यावी.

घरगुती गॅस सिलिंडर आज हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे नागरिक पुन्हा आता चुलीकडे वळले आहेत .त्यामुळे सबका साथ सबका विकास या मोदी सरकारच्या घोषणेच्या विरुद्ध हे सगळे घडत आहे. यावर आपण उपाययोजना करून सर्व सामान्यांना न्याय द्यावा, अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे.

वाढत्या महागाईमुळे लोकं चूल, सरपण व गवऱ्या व सायकलकडे वळत असून गॅस सिलेंडर व मोटारसायकल लोकांनी बाजूला ठेवल्या आहेत, असे सांगत याची प्रतिकात्मक प्रतिकृती भेट देण्याचा प्रयत्न देखील शिष्टमंडळाने केला. मात्र डॉ. भागवत कराड यांनी भेट स्वीकारण्यास नकार दिल्याचेही घोडके यांनी सांगितले. हिच प्रतिकृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील आपण पाठवणार असल्याचे ते म्हणाले. सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT