Latur DCC Bank News: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस नेते दिलीपराव देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘लातूर जिल्हा बँक शेतकऱ्यांचा आत्मा आहे,’ असे सांगितले जाते; मात्र ही बँक देशमुख कुटुंबाचा आत्मा बनली आहे, असा आरोप निलंगेकर यांनी केला. तसेच, सध्या चर्चेत असलेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाचा संदर्भ देत त्यांनी बँकेच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले.
सध्या चर्चेत असलेल्या दृश्यम चित्रपटाचे डायरेक्टर ते आहेत का? हे मी त्यांना विचारणार आहे, असा टोला भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलीपराव देशमुख यांना पत्रकार परिषदेतून लगावला. लातूर जिल्ह्यावर येणाऱ्या काळात पाणी टंचाईचे मोठे संकट येणार आहे. मी जिल्हा बँकेच्या निवडणुकीपेक्षा त्या संकटाला कसे सामोरे जायचे? याला प्राधान्य देऊन उद्यापासून काम सुरू करणार आहे. सरकारी मदत, उपाययोजना यासाठी पाठपुरावा करणार आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक आणि त्या अनुषंगाने विरोधकांच्या आरोपांना उत्तर आमचे इतर नेते देतील, असे स्पष्ट करतानाच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर टीका करणाऱ्यांना निलंगेकर यांनी सुनावले. लातूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठीच्या निवडणुकीतील दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर निलंगेकर यांनी माध्यमांशी सविस्तर संवाद साधत आपली भूमिका मांडली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावरही निलंगेकर यांनी नाराजी व्यक्त केली. महायुतीने एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सुचवलेल्या सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचे ठरले होते, असे निलंगेकर यांनी सांगितले.
मध्यंतरी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबत आपण दोन वेळा दिलगिरी व्यक्त केली होती. तरीही बाबासाहेब पाटील हे धीरज देशमुख यांच्या गाडीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले, असा दावा त्यांनी केला. “सहकारमंत्र्यांनी या पदाची गरिमा घालवली,” अशी टीका करत त्यांनी बाबासाहेब पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्यावर होणाऱ्या वैयक्तिक टीकेलाही निलंगेकर यांनी उत्तर दिले. बँकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले की ‘व्हिक्टोरिया प्रकरणा’चा उल्लेख करून आपल्यावर आरोप केले जातात, असे ते म्हणाले.
या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, डिस्टिलरी प्लांटसाठी ४० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी २५ कोटी रुपयांची उचल करून व्यवसाय उभारण्यात आला. मात्र, अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर राज्यात डिस्टिलरी व्यवसायाला परवानगी मिळाली नसल्याने कर्जाची परतफेड थकली, असा दावा त्यांनी केला.
हे कर्ज वैयक्तिक मालमत्ता तारण ठेवून घेतले होते आणि नंतर तडजोडीनुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कर्ज भरल्याचे निलंगेकर यांनी स्पष्ट केले. आपण कर्ज बुडवले नसून, कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा वापर वैयक्तिक टीकेसाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला.
तुमच्या कुटुंबात मतभेद नाहीत का? असा सवाल करत निलंगेकर यांनी आपल्यावर होणारे आरोप फेटाळले.लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सुसंस्कृतपणे लढवावी आणि राजकारणाची पातळी खालावू देऊ नये. आमची सगळ्या प्रकारची तयारी आहे, जिल्हा बँकेची निवडणूक कमरेखाली नेऊ नये, असे आवाहन निलंगेकर यांनी यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.