sambhaji raje chhatrapati, manoj jarange patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Indefinite Hunger Strike : मी प्रामाणिकपणे सांगतो; संभाजीराजे छत्रपतींनी जरांगे पाटलांना स्पष्टच सांगितलं

Sachin Fulpagare

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या आणि पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आज संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली. जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत आजपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी तिथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटील यांची भूमिका समजून घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील लेकरांवर अन्याय होतोय. मराठा समाज माझा माय-बाप. मी खोटं काहीच करणार नाही. आमचं काय चुकतं ते सरकारने सांगावं. आरक्षण देता येतंय. पण सरकार सतत म्हणतंय मागासलेपण सिद्ध करायचंय आणि कोर्टात जायचं आहे. आमचं म्हणणं तुम्ही जा. पण आमची मागणी आता ती नाही. आमचा कोर्टात जाण्याला विरोध नाही', असं मनोज जरांगे पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांना सांगितलं.

'विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील अनेकांचे ओबीसी प्रमाणपत्र आहेत. पण हे कुणाला माहिती नाही. आणि आम्ही ते शोधून काढले आहेत. आता तेच म्हणतात ओबीसीतून आरक्षण घेऊ नका, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली आहे. कुणबी शब्दचा चुकीचा अर्थ काढला जातोय. आता कुणबीचा सुधारीत शब्द शेती असा झाला आहे. आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे', असं जरांगे पाटील संभाजीराजेंना म्हणाले.

सरकारचा दूत म्हणून आलोय

'सरकार थोडा वेळ मागत आहे. सगळे परावे आहेत, तरी आरक्षण देत नाहीत. एक पुरावा सापडला तरी आरक्षण दिलं पाहिजे. सरकार काय निकष लावतंय? हेच कळत नाही. आधीच्यांना काय निकष लावले? हा खूप मोठा अन्याय आहे मराठा समाजावर', असं जरांगे पाटील यांनी म्हटलं.

'कोणत्या नेत्याच्या किंवा पक्षाच्या सांगण्यावरून आलेलो नाही. सरकारचा दूत म्हणून आलेलो नाही. ज्या दिवशी दूत म्हणून येईल, त्या दिवशी फुली मारायची. मी प्रामाणिकपणे इथे आलोय. तुम्हाला काय मदत लागली तर लगेच सांगा. तुम्हाला बळ देण्यासाठी आलो आहे. हे सगळं करत असताना काळजी घ्या', असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

'मनोज जरांगे हे आज पुन्हा उपोषणाला बसले. त्यामुळे मी त्यांची भेट घ्यायला आलो आहे. राजर्षी शाहू महाराजांनी पहिल्यांदा बहुजनांना आरक्षण दिलं होतं. आज गरीब मराठा समाज हा बाहेर फेकला गेला आहे. त्यामुळे गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी प्रयत्नशी आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांना चालता येत नव्हतं. शिवरायांचे आणि शाहू महाराजांचे वंशज म्हणून आमचं कर्तव्य आहे. समाजासाठी लढणाऱ्याला बळ देण्याचं काम छत्रपतींचं आहे. त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे', असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

'समाजासाठी जो माणूस झगडतो. जीवाचं रान करतो, अशा माणसाला बळ देण्याची जबाबदारी ही छत्रपती घराण्याची आहे. आणि म्हणून मी आज इथे आलो आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मनापासून तुमच्यासोबत आहोत. मला मनोज जरांगेंच्या तब्येतीची काळजी वाटते. त्यांनी आमरण उपोषण करावं, पण पाणी तरी प्यावं. एवढी विनंती मी छत्रपती घराण्याचा एक वंशज म्हणून करू शकतो', असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. संभाजीराजे छत्रपतींच्या विनंतीचा मनोज जरांगे पाटील यांनी मान राखला. आणि आजचा दिवस पाणी पिणार असल्याचं जाहीर केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT