Chandrakant Khaire-Uddhav Thackeray-Amadas Danve On Muncipal Corporation Election Sarkarnama
मराठवाडा

Shiv sena UBT News : पक्ष फुटीनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेत उद्धवसेनेचा कस लागणार!

Shivsena UBT Action Plan On Upcoming Municipal Corporation Election : सर्वाधिक फटका गेल्या 25 वर्षांपासून महापालिकेत सत्ताधारी पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसला.

Jagdish Pansare

  1. शिवसेनेच्या फुटीनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाची ताकद आणि संघटनशक्तीची मोठी परीक्षा आहे.

  2. खैरे आणि दानवे या स्थानिक नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष निवडणुकीच्या रणनीतीवर मोठा परिणाम करू शकतो.

  3. या वादातून पक्ष एकजूट दाखवतो की आणखी फूट पडते, यावर उद्धव सेनेचे राजकीय भविष्य अवलंबून आहे.

माधव इतबारे

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : महापालिका निवडणुकीसाठीचे आरक्षण आणि मतदार याद्या अंतीम झाल्या आहेत. महापौर पदाचे आरक्षण काही दिवसात जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. नगरपरिषद, नगरपंचायतीनंतर महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकाची रणधुमाळी सुरू होणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीची गेली पंचवीस वर्ष सत्ता होती. पक्ष फुटीनंतर होणाऱ्या पहिल्याच महापालिका निवडणुकीत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कस लागणार आहे.

कधीकाळी बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह शहरातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाताहत सुरूच आहे. पक्षफुटीनंतर झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने पक्षाला लागलेली गळती महापालिका निवडणुकीच्या तोंडावरही कायम आहे. विशेष म्हणजे शहरात पक्षाचे दोन नेते, एक उपनेता असताना आतापर्यंत सुमारे 18 माजी नगरसेवक, तर आठ माजी महापौरांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. त्यामुळे आता उरल्यासुरल्या आशा शिल्लक पदाधिकाऱ्यांकडून आहेत.

त्यात आर्थिक पाठबळ आणि चंद्रकांत खैरे-अंबादास दानवे या दोन नेत्यांमध्ये खरेच दिलजमाई होणार का? हे विषय पक्षासाठी आगामी महापालिका निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गळतीमुळे घायाळ झाला. सत्ताधारी महायुतीकडे म्हणजेच भाजप, शिंदे गटाकडे इच्छुकांचा अधिक कल दिसून येत असून, विरोधी पक्षातील माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाचे सोहळे सध्या सुरू आहेत.

सर्वाधिक फटका गेल्या 25 वर्षांपासून महापालिकेत सत्ताधारी पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसला. महापालिकेच्या 10 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एकसंध असलेल्या शिवसेनेला सर्वाधिक 28 जागा मिळाल्या होत्या. शिवसेना पुरस्कृत नगरसेवकांचा विचार केल्यास हा आकडा 32 पर्यंत होता. पण, शिवसेना पक्ष फुटल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची वाताहत सुरू झाली. लोकप्रतिनिधी, मोठे पदाधिकारी पक्ष सोडून गेले असले तरी संघटना अभेद्य आहे, असा दावा केला जात आहे.

पण, एवढी गळती लागली आहे की गेल्यावेळी 65 जागा लढणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला यावेळी एवढे उमेदवार मिळतील का? अशी अवस्था अनेक प्रभागांत आहे. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी चिंतेत आहेत. विशेष म्हणजे पक्षाने जिल्ह्यात माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे दोन नेते दिले. त्यासोबतच शिवसेनेच्या स्थापनेच्या काळातील सुभाष पाटील यांची उपनेतेपदावर वर्णी लावण्यात आली. सुभाष पाटील अनेक पक्ष फिरून पुन्हा ठाकरे गटात आले. त्यामुळे त्यांचे ऐकणार कोण?, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

तर खैरे-दानवे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. पक्ष रसातळाला गेला तरी या दोघांमधील वाद मिटलेला नाही. हा वाद महापालिका निवडणुकीतही कायम राहिला तर ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांची संख्यादोन आकडी तरी होईल का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. दोन नेत्यांच्या गटबाजीतून आतापर्यंत 18 माजी नगरसेवक, आठ माजी महापौरांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला. त्यामुळे पक्षात आता दोन नेते, एक उपनेता यांच्यासह बोटांवर मोजण्याएवढे पदाधिकारीच शिल्लक आहेत.

अनेकांनी शिवसेना, भाजपमध्ये प्रवेश केला. अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून चांगली कामगिरी केल्याचा दावा करत त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जात आहे. एकीकडे राज्य सांभाळताना त्यांना शहरातील आपली पकडही सोडायची नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीची जबाबदारी असलेल्या महानगरप्रमुख राजू वैद्य यांना स्वातंत्र्य दिले जात नसल्याचे चित्र आहे.

उरले फक्त कागदावरचे 'वाघ'

शिवसेना 'वाघ' आहे, अशा घोषणा नेते, पदाधिकारी नेहमीच देतात. पण, चिकलठाण्यात नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून वाघ आता फक्त कागदावरच असल्याचे दिसून आल्याची टीका होत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका गोशाळेत यावे लागले, त्यावरूनच पक्षाच्या ताकदीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

5 FAQs

1) खैरे-दानवे वादाचे मूळ कारण काय आहे?

दोघांमधील स्थानिक नेतृत्व, वर्चस्व आणि संघटनशक्तीवरील मतभेद हे वादाचे प्रमुख कारण मानले जाते.

2) हा वाद निवडणुकीवर कसा परिणाम करू शकतो?

पक्षामध्ये एकजूट नसल्यास मतविभाजन होऊ शकते आणि याचा थेट फायदा विरोधकांना मिळू शकतो.

3) उद्धव ठाकरेंचा पक्ष या निवडणुकीत कसोटीवर का आहे?

पक्ष फुटल्यानंतर उद्धव गटाची ताकद, कार्यकर्त्यांचा विश्वास आणि संघटनशक्ती सिद्ध करण्याची ही पहिली मोठी संधी आहे.

4) पक्षात सामंजस्य घडवण्यासाठी प्रयत्न होत आहेत का?

होय, स्थानिक नेते आणि वरिष्ठ पदाधिकारी वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

5) या वादाचा अंतिम निकाल काय असू शकतो?

वाद मिटला तर पक्ष मजबूत होऊ शकतो; अन्यथा अंतर्गत संघर्षामुळे निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT