Parbhani MP Sanjay Jadhav greets Uddhav Thackeray on his birthday through a social media post despite switching to the Shinde-led Shiv Sena.  Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Jadhav : पक्ष बदलला पण ठाकरेंशी निष्ठा कायम; 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या खासदाराच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

Sanjay Jadhav's Post on Uddhav Thackeray Birthday : मतदार संघातील विकास कामे व त्यासाठी लागणारा निधी मिळावा या कारणामुळेच आपण पक्षांतर केल्याचा दावाही वेळोवेळी खासदार संजय जाधव यांनी केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर आतापर्यंत कधीच टीका केली नाही.

Jagdish Pansare

Parbhani News, 27 Jul : संपूर्ण राजकीय आयुष्य ज्या पक्षात घातले, तो पक्ष आणि नेत्याचे नेतृत्व सोडून गेल्यानंतर अनेकदा संबंध बिघडतात. मात्र परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी हा समज खोटा ठरवला. ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय जाधव हे आपल्या जुन्या नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंना अद्याप विसरलेले नाहीत.

आज उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून जाधव यांनी शुभेच्छा देत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर आपण कुठलीच टीका करणार नाही, आपल्या समर्थकांनीही ती करू नये असे स्पष्टपणे सांगत नाईलाजाने आपल्याला पक्ष सोडावा लागत असल्याचे खासदार संजय जाधव यांनी स्पष्ट केले होते.

मतदार संघातील विकास कामे व त्यासाठी लागणारा निधी मिळावा या कारणामुळेच आपण पक्षांतर केल्याचा दावाही वेळोवेळी खासदार संजय जाधव यांनी केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर आतापर्यंत कधीच टीका केली नाही. आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पक्ष बदलला असला तरी आपल्या निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याशी कायम असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या या मोठेपणाची चर्चा परभणी जिल्ह्यात होऊ लागली आहे.

ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राजकीय भूमिका बदलल्यानंतरही जाधव यांनी ठाकरे यांच्याविषयी व्यक्त केलेला आदर आणि शुभेच्छांचा संदेश हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

मतदारसंघाच्या विकासासाठी सत्ताधारी गटासोबत जाण्याचा निर्णय घेत खासदार जाधव यांनी ठाकरे गटाला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या सोबत ठाकरे गटातील आणखी पाच खासदारांनीही शिंदे गटाची वाट धरली होती. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी जाधव यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली होती.

परभणीत त्यांच्या विरोधात जाहीर सभाही घेण्यात आली होती. या जाहीर सभेत खासदार संजय राऊतांनी अत्यंत खालच्या भाषेत खासदार जाधव यांच्यावर टिका केली होती. मात्र, या संपूर्ण राजकीय संघर्षात खासदार जाधव यांनी उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबीयांविषयी कधीही आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. उलट, परभणीत कार्यकर्त्यांनीही ठाकरे कुटुंबियांबद्दल अपशब्द वापरू नयेत, अशी भूमिका त्यांनी सार्वजनिकरीत्या मांडली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय मतभेद असूनही वैयक्तिक पातळीवरील सन्मान कायम असल्याची चर्चा वेळोवेळी होत होती.

याच पार्श्वभूमीवर सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय जाधव यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर शुभेच्छा संदेश पोस्ट केला. या स्टिकरमध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो, स्वतःचा फोटो आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यांचा समावेश करण्यात आला होता. संदेशात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

परभणीत तर्के वितर्कांना उधान

जाधव यांच्या या पोस्टनंतर परभणीच्या राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. काहींनी हा केवळ राजकीय सभ्यतेचा भाग असल्याचे म्हटले, तर काहींनी भविष्यातील राजकीय समीकरणांच्या शक्यतांशी त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, खासदार जाधव यांनी या शुभेच्छांमागे कोणताही राजकीय संदेश नसल्याचे स्पष्ट केलेले नसल्याने या पोस्टची चर्चा दिवसभर रंगली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT