Mla Sanjay Shirsat News, Mumbai
Mla Sanjay Shirsat News, Mumbai Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat : नाराजीच्या बातम्या द्याल तर मानहानीचा दावा दाखल करणार..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने प्रसार माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांना कंटाळून आणि स्पष्टीकरण देऊन थकलेल्या शिरसाट यांनी अखेर माध्यमांनाच तंबी दिली. यापुढे मला न विचारता नाराजीच्या बातम्या दिल्या तर मी मानहानीचा दावा दाखल करेल, असा इशारा संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.

राज्यातील सत्तांतरानंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे आमदार शिरसाट हे नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. (Marathwada) त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या वर्षा बंगल्यावरील स्नेहभोजनास ते जाणार नाहीत यामागे देखील नाराजी हेच कारण असल्याचे सांगितले जात होते.

मात्र त्यानंतर शिरसाट यांनी पुन्हा गैरसमज नको म्हणून मतदार संघातील कामे बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला हजेरी लावली होती. आता पुन्हा एकदा संजय शिरसाठ नाराज असल्याच्या बातम्या आल्या आहेत. यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच केलेल्या उपनेत्यांच्या नियुक्त्यांचे कारण सांगितले जाते.

मंत्रिमंडळातून डावलेल्या संजय शिरसाठ यांना उपनेत्यांच्या यादीत देखील स्थान मिळाल्यामुळे ते नाराज असल्याच्या बातम्या कालपासून प्रसार माध्यमांमध्ये पसरल्या. या संदर्भात मुंबईत बोलताना शिरसाट यांनी नाराजीच्या बातम्या चालवणाऱ्या माध्यमांना तंबी दिली.

शिरसाट म्हणाले नाराजीच्या बातम्या आणि त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्पष्टीकरण देऊन मी कंटाळलो आहे. शिंदे यांच्यासोबत आम्ही सत्ता, मंत्रीपद अशा कुठल्याही कारणामुळे गेलो नाही. तर एका ध्येयासाठी आम्ही शिंदे यांच्या सोबत गेलो होतो.

त्यामुळे मंत्रिपद मिळाले नाही, उपनेते पद मिळाले नाही म्हणून मी नाराज असल्याच्या बातम्या वारंवार चालवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या बातम्या मला न विचारता दिल्यास मी संबंधितांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT