Mla Sanjay Shirsat News, Aurangabad
Mla Sanjay Shirsat News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat News : जे जे शिवसेनेचे ते आता आमचे ; शिवसेना भवनावर दावा..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर आता राज्यभरात शिवसेनेची कार्यालय, शाखांवर दावा सांगितला जातोय. मुंबईच्या शिवसेना भवनावर आम्ही दावा सांगणार नाही म्हणणारे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी औरंगाबादेत असलेल्या शिवसेना भवनावर मात्र दावा सांगितला आहे.

शिवाई ट्रस्टच्या माध्यमातून महापालिकेच्या जागेवरील नाल्यावर पाच मजली शिवसेना भवन उभारण्यात आले आहे. हे शिवसेना भवन ताब्यात घेणार असल्याचे संजय शिरसाट व जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे. जे जे (Shivsena) शिवसेनेचे ते ते आता आमचे असं म्हणत त्यांनी शिवसेना भवनावर हक्क सांगितला आहे. (Aurangabad)

तर ठाकरे गटाने मात्र त्यांना काय करायचे ते करू द्या, आम्ही कायदेशीर मार्गाने लढू, अशी भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता शिंदे व त्यांचे समर्थक कशाकशावर दावा करतील याबद्दल चर्चा सुरू आहे. मुंबईतील शिवसेना भवन, पक्षाच्या नावावर जमा असलेले कोट्यावधी रुपये याचे काय? असा सवाल देखील उपस्थीत केला जात आहे.

अशातच औरंगाबादेतील शिवसेना भवनावर शिंदेच्या शिवसेनेने दावा केला आहे. औरंगाबादेतील औरंगपुरा येथे महापालिकेच्या जागेवरील पाच मजली शिवसेनाभवन आम्हाला मिळाले पाहिजे, ते आम्ही ताब्यात घेणारच असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. पाच मजली असलेल्या या इमारतीत ८ कार्यालये आणि २२ गाळे आहेत. सुभाष देसाई, लिलाधर डाके विश्वस्त असलेल्या शिवाई ट्रस्टला महापालिकेने ही जागा करारावर दिली होती.

महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता असल्यामुळे इथे पाच मजली इमारत उभारून मुंबईच्या धरतीवर मराठवाड्यासाठीचे शिवसेना भवन म्हणून हे उभारण्यात आले होते. परंतु भोगवटा प्रमाणपत्र व इतर बाबींमुळे सध्या या इमारतीचा वाद सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वापराविना ही इमारत धूळखात पडून आहे. आता याकडे शिंदे सेनेचे लक्ष गेले आहे. ठाकरे गटाने मात्र ही शिवाई ट्रस्टची इमारत आहे, त्यामुळे ती ताब्यात घेण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT