Chhatrapati Sambhajinagar Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात वेगवागन राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काही माजी नगरसेवकांसह शिवबंधन हाती बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे. असे असताना आता लवकरच आणखी एक मोठी राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता दिसत आहे.
कारण, छत्रपती संभाजीनगरमधील शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, राजू शिंदेंनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने आता ठाकरे गटातील काही पदाधिकारी हे आमच्याकडे येणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र या पदाधिकाऱ्यांची नावे त्यांनी यावेळी सांगितली नाही. त्यामुळे नेमके कोणते पदाधिकारी हे राजू शिंदेंच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे नाराज आहेत, याबाबत अंदाज लावले जात आहेत.
राजू शिंदे(Raju Shinde) यांनी छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवून ठाकरे गटात प्रवेश केल्याचं बोललं जात आहे. कारण, या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे संजय शिरसाट आहे. महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच आपल्याला तिथे महायुतीत राहून संधी विधानसभेसाठी उमेदवारी मिळणे कठीण असल्याचे ओळखून राजू शिंदे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं सांगितलं जात आहे.
तर यावर एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना आमदार संजय शिरसाट म्हणाले, 'राजू शिंदे यांनी मागीलवेळी निवडणूक लढवली होती. एकदा तर त्यांनी अपक्ष म्हणून भाजपशी बंडखोरीही केलेली आहे. आता त्यांना जेव्हा इकडे समजलं की आपल्याला ही जागा सुटणार नाही, म्हणून ते उबाठा गटात जावून उमेदवारी मागण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. उबाठा गटाचे काही पदाधिकारी हा माणूस तिकडे गेल्यानंतर आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत.'
याशिवाय छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघावर भाजपचाही(BJP) डोळा असल्याच्या चर्चा आहेत. भाजपचे महानगर प्रमुख शिरीष बोराळकर यांच्याकडून या जागेसाठी भाजपचा दावा सांगितला गेल्याचं समोर येत आहे. त्यावर शिरसाटींनी बोलताना म्हटलं की, 'असं मीडियाच्या मागून जागा कशाला मागता, माझ्याकडे या मी सोडतो. ते का अशा मागण्या करत आहेत, का वातावरण खराब करत आहेत? मला वाटतं त्यांना पक्षाची शिस्त कळते.'
तसेच 'ते एक जबाबदार पदाधिकारी आहेत, हा दावा त्यांनी स्वत: देवेंद्र फडणवीसांकडे करावा, प्रदेशाध्यक्षांकडे करावा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आहेत, हे सर्वजण जो निर्णय घेतील तो मान्य करू. परंतु दरवेळी मीडियासमोर जावून असं बोलणं उचित नाही.' असंही शिरसाटांनी बोलून दाखवलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.