Santosh Bangar 
मराठवाडा

Santosh Bangar: संतोष बांगर यांची मंत्रीपदासाठी फिल्डिंग! कावड यात्रेत श्रीकांत शिंदेंसमोर नेमकं काय घडलं? खासदारांनी कसा दिला प्रतिसाद?

Santosh Bangar: शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या कळमनुरी ते औंढा नागनाथ या कावड यात्रेची राज्यभरात चर्चा होत असते. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना या कावड यात्रेत सहभागी झाले होते, यंदा खासदार श्रीकांत शिंदे यांनी याला हजेरी लावली.

Jagdish Pansare

Santosh Bangar: शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या कळमनुरी ते औंढा नागनाथ या कावड यात्रेची राज्यभरात चर्चा होत असते. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतांना या कावड यात्रेत सहभागी झाले होत. तर यंदा खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी भोलेनाथला आपण 2029 मध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे, असं साकडं यावेळ संतोष बांगर यांनी घातलं. तर श्रीकांत शिंदे यांनी भाषणाला सुरूवात केली तेव्हा बांगर समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांना मंत्री करा असा धोशाच सगळ्यांनी लावला.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे म्हणून भोलेनाथाला बांगर यांनी साकडे घातले असले तरी त्यांच्या मंत्रीपदासाठी शिंदेंनाच साकडे घालावे लागणार आहे. विशेष म्हणजे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी या कावड यात्रेत सहभागी होत एकदा संतोष बांगर यांना मंत्री करूनच टाका, अशी माझीही हात जोडून विनंती असल्याचे म्हटले. बांगर यांच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला जर मंत्री केले तर महाराष्ट्रात याची चर्चा होईल, असेही आष्टीकर म्हणाले. माझे आणि त्याचे आधी खूप वाद होते, संतोष बांगर मला नाही नाही ते बोलले, मी ही त्यांना हटवण्याची मागणी केली होती, याची कबुलीही आष्टीकरांनी दिली. पण मी कायम त्यांच्या पाठीशी होतो, यापुढेही राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शिंदे साहेबांमुळे मी आमदार, मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो तेव्हापासून हिंगोली जिल्ह्यात मला आजी, माजी आमदारांकडून विरोध सुरू झाला होता. 2014 मध्ये मला विधानसभेची उमेदवारी मिळणार होती, पण सगळ्यांनी माझ्यावर आरोप केले, मला गुंड म्हणून हिणवले, मी आमदार झालो तर हिंगोलीत खून पडतील, असा अपप्रचार केला. पण 2019 मध्ये मला एकनाथ शिंदेसाहेबांमुळे संधी मिळाली आणि मी आमदार झालो. पाच वर्षात लोकांची अशी कामे केली की 2024 मध्ये मला दुसऱ्यांदा संधी मिळाली आणि लोकांनी मला 42 हजारांच्या मताधिक्याने दुसर्‍यांदा निवडून दिले. शिंदेसाहेबांमुळेच मी आमदार होऊ शकलो. ते मुख्यमंत्री असताना कावड यात्रेत सहभागी झाले.

यापुर्वी मी अनेकदा शिवसेनेच्या त्या नेत्यांना कावड यात्रेला बोलावले, पण ते आले नाही. ज्यांनी कावड यात्रेकडे पाठ फिरवली, त्यांना राजकारणातून घरी बसवलं, असा चिमटाही बांगर यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता काढला. दरम्यान, श्रीकांत शिंदेंसमोर बांगर समर्थकांनी मंत्रीपदासाठी धोशा लावल्यानंतर यावर आताच मंत्री करू का? अशी फिरकी शिंदे यांनी उपस्थितांची घेतली. तुमच्या भावना मी एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचवतो, पण त्यांना मंत्री करणे माझ्या हातात नाही, असे सांगत गुगलीही टाकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT