Rajesh tope-Khotkar
Rajesh tope-Khotkar Sarkarnama
मराठवाडा

शाळा बंद, मग शिक्षकांनी वडापाव विकावा का? विनाअनुदानित शिक्षक संतापले

सरकारनामा ब्युरो

जालना : कोरोना वाढता संसर्ग आणि रुग्ण संघ्या पाहता राज्य सरकारने राज्यातील सर्वशाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद केल्या आहेत. (Jalna) गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे खाजगी विनाअनुदानित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे.

चाळीस हजारांपेक्षा जास्त शाळेतील तब्बल बारा लाख शिक्षक-कर्मचाऱ्यांवर उपसमारीची वेळ आली आहे. आता पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, मग शिक्षकांनी आता वडापाव विकावेत का? अशा शब्दात इंडिपेंडेट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री राजेश टोपे, (Rajesh Tope) माजी मंत्री अर्जून खोतकर (Marathwada) यांच्यासमोर संताप व्यक्त केला.

माॅल, जीम, बार, दारूची दुकाने सुरू असतांना शाळाच बंद का? ५० टक्के उपस्थितीत शाळा सुरू ठेवण्यास परवानगी द्या, अशी मागणी देखील संघटनेच्या वतीने यावेळी टोपे, खोतकर यांच्याकडे करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर विनाअनुदानित शाळांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

यावर आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून तुमची समस्या त्यांच्यापर्यंत निश्चित पोहचवू, ते योग्य निर्णय घेतील असे आश्वासन टोपे यांनी या शिष्टमंडळाला दिले. राज्यातील विना स्वयं अर्थसहाय्यीत शाळांमध्ये १० लाख शिक्षक आणि २ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. शाळा बंद झाल्यामुळे १२ लाख जणांवर उपासमारीची वेळ आली आहे.

यापुढेही शाळा बंद ठेवण्याचा आणि लाॅकडाऊनचा सरकारचा विचार असेल तर आमच्या उदर्निवाहाची सोय करा, आम्हाला दरमहा दहा हजार रुपये लाॅकडाऊन भत्ता द्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिक्षकांच्या भावना लक्षात घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

टोपे म्हणाले, राज्यात कोणत्याही परिस्थितीत लाॅकडाऊन लावला जाणार नाही. सध्या राज्यात दररोज ५० हजार कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. अशावेळी खबरदारीचे उपाय म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकांची देखील आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची तयारी नाहीये. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक, कर्मचारी गेल्या वर्ष-दीड वर्षापासून अडचणीत आहेत, याची मला जाणीव आहे.

पालकांनी फीस न भरल्यामुळे व्यवस्थापनाने देखील शिक्षक, कर्मचाऱ्यांना पगार दिले नाहीत. पण यावेळची परिस्थिती तशी नाही. गेल्या वर्षीप्रमाणे खूप कालावधीपर्यंत शाळा बंद ठेवाव्या लागणार नाहीत. जानेवारी अखेरपर्यंत कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने घटण्याचा अंदाज आहे. रुग्ण संख्या कमी व्हायला सुरूवात झाली की लगेचच शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.

त्यामुळे काही काळ आपण संयम बाळगा, असे आवाहन देखील टोपे यांनी संबंधितांना केले. या शिवाय ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरू करण्याची आपली मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी स्वतः घेऊन जाईल, त्यावर योग्य निर्णय तेच घेतील असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT