Hingoli farmers protest : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी होणाऱ्या जमीन भूसंपादनाविरोधात हिंगोलीतील शेतकऱ्यांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला. पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
गेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून प्रश्नावर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या (Narhari Zirwal) उपस्थितीत ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शक्तिपीठ महामार्गामुळे जमीन भूसंपादनाच्या प्रक्रियेला सामोरे जाणारे शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठक सुरू होताच शेतकऱ्यांनी (Farmer) शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. “आम्हाला बरबाद करणारा शक्तिपीठ महामार्ग कुणाला पाहिजे?” असा सवाल करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काही शेतकरी थेट पालकमंत्री झिरवळ यांच्या टेबलासमोर पोहोचल्याने काही काळ बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी तातडीने सावध भूमिका घेत पालकमंत्री झिरवळ यांच्याभोवती सुरक्षा कडे उभे केले. घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह दणाणून गेले.
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात यापूर्वीही हिंगोलीतील शेतकऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निवेदन दिले होते. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांवर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. मात्र, या आश्वासनानंतरही पुढील कार्यवाही झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढल्याचे आजच्या गोंधळातून स्पष्ट झाले. पालकमंत्री झिरवळ यांनी या प्रश्नावर पुढाकार घ्यावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसमत तालुक्यांमधून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. या मार्गासाठी जमीन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, अनेक शेतकऱ्यांनी त्याला विरोध दर्शविला आहे. महसूल विभागाने पोलिस बंदोबस्तात जमिनींची मोजणी सुरू केली असता स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला होता. परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर घटनास्थळी पोहोचले होते. त्यांच्या हस्तक्षेपानंतर मोजणीचे काम थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
आजच्या बैठकीला आमदार संतोष बांगरही उपस्थित होते. मात्र, शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांनी या वादात कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याची चर्चा बैठकीनंतर सुरू झाली. शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या बाजूने किंवा प्रशासनाच्या भूमिकेच्या समर्थनार्थ त्यांनी स्पष्टपणे हस्तक्षेप केला नसल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन भूसंपादनाचा प्रश्न आता हिंगोलीतील कळमनुरी आणि वसमत तालुक्यांत अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री स्तरावरील बैठकीच्या आश्वासनानंतरही तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला असून, पुढील काळात या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.