Sharad Pawar In Jalna News
Sharad Pawar In Jalna News Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar In Jalna News : शरद पवारांनी शब्द पाळला अन् सूचक संदेशही दिला..

तुषार पाटील

Jalna : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नुकतीच जाफराबादच्या नगराध्यक्ष व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. (Sharad Pawar In Jalna News) शरद पवार यांनी त्यांच्या घरी केलेल्या चहापानाने भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

जाफराबाद सारख्या एका छोट्या नगर पंचायतीच्या नगराध्यक्षांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार अचानक आले. (Ncp) राष्ट्रवादीतील आजी-माजी सर्वच जिल्ह्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांना या दौऱ्यातून अप्रत्यक्ष संदेश शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला. सुरेखा लहाने यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आदेश त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना यावेळी दिले. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फेरबदलाचे संकेत दिले होते.

पवारांच्या जाफराबाद दौऱ्याने अनेकांना धक्का दिल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात सुरू आहे. जाफराबाद नगर पंचायतीत राष्ट्रवादीचे सात, काॅग्रेसचे सहा, भाजपचे चार असे नगरसेवक असून यातील राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेस व भाजपच्या मिळून चौदा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरेखा लहाने यांच्याविरोधात तक्रार केली. (Jalna) लहानेंविरूध्द कारवाईची शिफारस राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर लहानेंनी थेट पुण्यात पवारसाहेबांकडे दाद मागितली. तेव्हा मी स्वतः जाफराबादला येतो, असा शब्द दिला होता. दिलेला शब्द पाळत पवार थेट जाफराबादला येऊन धडकले.

केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे शरद पवार यांच्यासोबत असलेले संबंध सर्वश्रुत आहेत. रामेश्वर सहकारी साखर कारखाना उभारण्यात पवार यांनी दानवेंना मोठी मदत केली होती. केंद्रीय कृषीमंत्री असताना दुष्काळ पाहणी दौऱ्यात टोपेंना डावलून दानवेंना स्वतःच्या गाडीत घेऊन पवार फिरले होते. काही वर्षांपूर्वी चंद्रकांत दानवे आणि टोपेंचा विरोध असताना रावसाहेबांच्या जालन्यातील घरी त्यांनी पाहूणचार घेतला होता. पण आज स्वतःच्या पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी ते उभे राहिले हे विशेष.

लहानेंच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असून देखील पवारांनी त्यांना अभय दिल्याचे बोलले जाते. लोकसभेसाठी जालना मतदारसंघातून चंद्रकांत दानवेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची चाचपणी या दौऱ्यातून केली असावी असा राजकिय अंदाज वर्तवला जात आहे. नेत्यांच्या मागेपुढे फिरणाऱ्यांनाच त्यांचा आशिर्वाद मिळतो, किंवा तेच साहेबांच्या लक्षात राहतात हा समज शरद पवारांनी या दौऱ्यातून खोडून काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT