Maharashtra Politics News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसापासून राज्यात सुरू आहेत. शिंदे यांचे वारंवार नाराज होऊन आपल्या गावी जाणे, मुख्यमंत्र्यांसोबतचे कार्यक्रम टाळणे असे प्रकार समोर येत असल्याने राज्यातील या प्रमुख दोन नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आहे. आज शिंदे-फडणवीस दोघेही छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते.
थोड्या फार अंतराने दोघांचे संभाजीनगरात आगमन झाले. पण शिंदे हे आपल्या बुलडाण्याच्या आभार दौऱ्यासाठी निघून गेले. तर फडणवीस हे शासकीय राज्य कर्करोग रुग्णालयाच्या कार्यक्रमाला. तसं पाहिलं तर शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमाला हजर राहून पुढे बुलडाण्याला जाऊ शकत होते. पण त्यांनी हा कार्यक्रम टाळत आपल्या पक्षाच्या आभार दौऱ्याला प्राधान्य दिले. पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांना पाठवले होते.
विशेष विमानांची व्यवस्था करत पर्यटकांना राज्यात सुखरूप आणल्याचे श्रेय भाजपाला लाटायचे होते, अशी चर्चा होती. परंतु एकनाथ शिंदे व त्यांच्या आधी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे आपल्या पथकासोबत काश्मीरात दाखल झाले होते. गिरीश महाजन यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी सोपवलेली असताना शिंदे काश्मीरात कशासाठी गेले? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. विशेष म्हणजे याची कल्पना मुख्यमंत्र्यांना देण्यात आली नव्हती, अशीही चर्चा आहे. यावरूनच सध्या शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जाते.
शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर उपचार प्रणालीचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय आरोग्य,कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, संदिपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सतिष चव्हाण, नारायण कुचे, अनुराधा चव्हाण, संजना जाधव यांची यावेळी उपस्थिती होती.
शिवसेनेचे खासदार आणि काही आमदारांनी या शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावली. पण संभाजीनगरात येऊनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या कार्यक्रमापेक्षा पक्षाच्या बुलडाणा येथील आभार दौऱ्याला अधिक प्राधान्य दिले. संभाजीनगर विमातळावरूनच शिंदे बुलडाण्याला रवाना झाले. तर इकडे शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यावर संपूर्णपणे भाजपाची छाप दिसली. राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रालयाचाही पदभार आहे. परंतु शिंदेंचे बुलडाण्याचे आमदार यांनीच महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत टीका केली.
यावर फडणवीसांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांना खडसावल्यानंतर त्यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विशेष म्हणजे हेच गायकवाड बुलडाण्यातील आभारा दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शेजारी बसले होते. एकूणच राज्याच्या या दोन प्रमुख नेत्यांमध्ये सध्या चांगलेच बिनसल्याचे दिसते. या शिवाय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रताप जाधव हे ही संभाजीनगर येथील शासकीय राज्य कर्करोग संस्थेच्या कार्यक्रमाला निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही दांडी मारली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.