Cm Eknath Shinde-Supriya Sule News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shinde : दोन मुख्यमंत्र्यांची सवय तुम्हाला होती, आम्ही तुमचा रिमोट काढून घेतला..

भुमरे तुमची ताकद या निमित्ताने दिसली, पैसे देवून गर्दी जमवल्याचा आरोप करणाऱ्यांना म्हणांव आता रिपोर्ट करा, तुम्हाला ज्यांच्याकडे करायचा आहे त्यांच्याकडे. (Cm Eknath Shinde)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : दोन मुख्यमंत्र्यांची सवय तुम्हाला होती, आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण आणि निर्णय कोण घ्यायचे, रिमोट कोणाचा चालायचा हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे दोन मुख्यमंत्र्यांची सवय तुम्हाला होती. पण आम्ही ५० जणांनी तुमचा रिमोट कंट्रोल काढून घेतला, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलेल्या टीकेला प्रत्युतर दिले.

पैठण (Paithan) येथील जाहीर सभेत बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. अजित पवार, जंयत पाटली, सुप्रिया सुळे यांच्यावर शिंदे यांनी टीका करतांना मला तुमच्या भानगडीत पडायचे नाही, मी राज्याच्या हितासाठी काम करत राहणार, लोकांमध्ये जात राहणारच, असे ठणकावून सांगितले. (Marathwada) रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात आज मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी आपल्यावरील टीकेला सडेतोड उत्तर दिले.

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या महाराष्ट्राला आता दोन मुख्यमंत्री पाहिजे या टीकेचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, मी जनतेचा मुख्यमंत्री आहे, लोकांसाठी आमचे सरकार आहे, त्यामुळे मी सगळ्यांसोबत जाणार, फोटो काढणार मग कुणी काहीही टीका केली तर मला त्याची पर्वा नाही. आधी अजितदादा टीका करायचे, आता ताई देखील बोलायला लागल्या. म्हणाल्या, अजितदादा सकाळी सहावाजेपासून लोकांची कामे करतात, ताई मी सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांची कामे करतो.

फोटो काढण्यावरून देखील माझ्यावर टीका केली, म्हणतात मी फोटोग्राफर सोबत घेऊन जातो. आम्हाला त्याची गरज नाही, लोक प्रेमाने येतात, फोटो काढतात तर त्यांना नाही म्हणायचे. ज्यांच्यासाठी सत्ता आणि राज्य आहे, त्यांच्यासोबत फोटो काढले तर काय बिघडले. आम्ही अशा ठिकाणी जातो जिथे फोटोग्राफर सोबत नेता येतो, तुम्ही कुठे जाता आम्हाला माहित नाही, असा टोला देखील शिंदे यांनी लगावला.

दोन मुख्यमंत्री तुम्हाला माहित आहेत, तुमच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एक आणि निर्णय घेणारे, रिमोट कंट्रोल चालवणारे कोण होते हे सगळ्यांना माहित आहे. पण आम्ही ५० जणांनी तुमचा रिमोट काढून घेतला हीच तुमची पोटदुखी असल्याचा टोला देखील शिंदे यांनी लगावला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांना देखील शिंदे यांनी चिमटा काढला.

जंयत पाटलांना विधानसभेचा विरोधी पक्ष नेता व्हायचं होतं, पण दादांची दादागिरी चालली आणि जयंत पाटलांचे स्वप्न भंगले. मग महाराष्ट्रात रोखता आले नाही म्हणून जयंत पाटलांनी अजितदादांना दिल्लीत रोखले, त्यांना भाषण करू दिले नाही आणि ते नाराज होऊन निघून गेले, असा चिमटा देखील शिंदे यांनी काढला. दरम्यान, सभेला जमलेल्या गर्दीचा उल्लेख करत आम्ही घेतलेला निर्णय जनतेला आवडला आहे, त्याचीच ही पावती असल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला.

भुमरे तुमची ताकद या निमित्ताने दिसली, पैसे देवून गर्दी जमवल्याचा आरोप करणाऱ्यांना म्हणांव आता रिपोर्ट करा, तुम्हाला ज्यांच्याकडे करायचा आहे त्यांच्याकडे, असा टोला देखील शिंदे यांनी शिवसेनेला लगावला. बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती याचे उत्तर या सभेच्या गर्दीने दिले आहे. पैसे देवून आलेली नाही तर प्रेमाने आलेली ही गर्दी आहे. तुमचे मनापासून धन्यवाद. एकदा शब्द दिला की मी स्वतःचही ऐकत नाही, भुमरेही तसेच असल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

मुस्कटदाबी,अन्याय झाला म्हणून आम्ही बाहेर पडलो. आम्हाला रोखण्यासाठी सत्तेचा वापर केला गेला, पण आम्ही सगळ्यांना पुरून उरलो. सगळ्या जाती-धर्माचे लोक आमचे बंड यशस्वी व्हावे म्हणून प्रार्थना करत होते. अडीच वर्षाचा वनवास संपावा असे प्रत्येकाला वाटत होते. सगळीकडे नैराश्य पसरले होते, त्यामुळे सगळे सण जल्लोषात साजरे करण्याचा निर्णय आम्ही घेतला.

लोकांच्या भावना जाणून घेवून काम करायचे असते. कारण हे सरकार जनतेसाठीचे आहे. जिकडे जातो तिकडे लोकांचे प्रेम मिळते आहे, त्यांना हा आपला माणूस, आपला मुख्यमंत्री वाटतो. महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही निर्णय घेतला, लोकांना तो आवडला प्रेमाची माणसं बोलवतात म्हणून मी जातो. टीका करणे हा विरोधकांचा धंदा आहे त्यांना ते करू द्या, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT