Cm Eknath Shinde-Mla Sandipan Bhumre News
Cm Eknath Shinde-Mla Sandipan Bhumre News Sarkarnama
मराठवाडा

शिंदेसाहेब औरंगाबाद लोकसभेला कुणीही उमेदवार द्या, त्याला निवडून आणू ; भुमरेंचा शब्द..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होऊन ते राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोरांचा आत्मविशास चांगला वाढला आहे. प्रत्येक बंडखोर आमदार हा एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) कौतुक करतांना थांबत नाहीये. दोन दिवसांपुर्वी मुंबईत झालेल्या शक्तीप्रदर्शनात शिंदेंच्या बंडात आघाडीवर असलेले (Aurangabad) औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार संजय शिरसाट, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे तर उठता बसता मुख्यमंत्र्यांचे नाव घेत आहेत.

मुंबईच्या सत्कार समारंभात संदीपान भुमरे यांनी केलेल्या भाषणात एक धाडसी विधान केले. (Shivsena) `शिंदेसाहेब औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात तुम्ही कोणालाही उमेदवारी द्या, त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही तिघेही नेटाने प्रयत्न करू, एवढेच नाही तर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा कोणत्याही निवडणुकीत बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेसाहेबांचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दच भुमरे यांनी दिला.

भुमरेंचा हा आत्मविश्वास पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. एकीकडे शिवसेनेचे नेते म्हणतात की, गद्दारांपैकी एकही बंडखोर पुन्हा निवडून येणार नाही, तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील मी ५० पैकी एकाही उमेदवाराला पडून देणार नाही, असे म्हणत विरोधकांना आव्हान दिले आहे. भुमरे यांच्या विधानाने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर शिंदे गट दावा सांगणार हे आता स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार अडीच वर्ष टिकले आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सोबत राहिले तर औरंगाबादेत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पहायला मिळेल. भुमरे यांनी आपल्या भाषणात संजय राऊत यांनी त्यांना वाॅचमन म्हणून केलेल्या टीकेचाही समाचार घेतला.

भुमरे म्हणाले, संजय राऊत मला वाॅचमन म्हणाले, हो मी वाॅचमन होतो, पण ३५-४० वर्षाच्या राजकारणात माझ्या पैठण मतदारसंघातील ग्रामपंचयात पासून विधानसभा निवडणुकीपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये कधी भगवा खाली येऊ दिला नाही. जीवापाड मेहनत घेतली आणि गावा-ताड्यांपर्यंत शिवसेना पोहचवली. तेव्हा लोक आम्हाला पाच-पाच वेळा निवडून देतात.

एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका राज्यातील प्रत्येक बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पटली आहे. म्हणूनच आज अनेक पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार शिंदेसाहेबांसोबत येत आहेत. भविष्यात शिंदेसाहेबांची शिवसेनाच खरी बाळासाहेबांची शिवसेना म्हणून ओळखली जाणार आहे, असा दावाही भुमरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT