Imtiaz Jaleel sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel News : 'आदर्श'च्या ठेवीदारांसाठी इम्तियाज जलील यांची शिरखुर्मा पार्टी; निवडणुकीत पाठिंबा मिळणार का?

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : यंदा लोकसभा निवडणूक असल्यामुळे शिरखुर्मा पार्ट्यांना उधाण येणार आहे.

Jagdish Pansare

Loksabha Election 2024 : एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. पाच वर्षांत खासदार म्हणून केलेली कामगिरी, संसदेत जनतेच्या प्रश्नावर उठवलेला आवाज, केलेली आंदोलन या सगळ्यांचा लेखाजोखा आणि प्रगती पुस्तक इम्तियाज जलील यांनी मतदारांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

जनतेच्या प्रश्नावर केलेल्या आंदोलनापैकीच एक म्हणजे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधींचा घोटाळा. आयुष्यभराची जमापुंजी, कष्टाची कमाई संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे बुडाली. तब्बल दहा महिने लढा दिला, मोर्चे काढले, आंदोलनं केली, पण अजून हाती काहीच लागले नाही.

इम्तियाज जलील(Imtiaz Jaleel) यांनी आदर्शच्या ठेवीदारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले. पोलिस, जिल्हा प्रशासन, राज्य पातळीवर सहकार खात्याचे मंत्री, मुख्यमंत्री अशा सगळ्यांना जाब विचारत इम्तियाज व आदर्श नागरी सहकारी पतसंस्था संघर्ष समितीच्या लढ्याला काही प्रमाणात यश आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पतसंस्थेच्या अध्यक्षासह संचालक मंडळातील दोषींवर गुन्हे दाखल झाले, या घोटाळ्याची एसआयटी चौकशी लागली, मालमत्ता जप्त करून त्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली. या घोटाळ्याकडे डोळेझाक करणाऱ्या सहनिंबधक कार्यालयातील अधिकारी, लेखा परिक्षक व इतरांवर गुन्हे दाखल झाले. हे या आंदोलनाचे यश असले तरी प्रत्यक्षात ठेवीदारांच्या हातात अजून एक छदामही आलेला नाही. पण ठेवीदारांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर दाखवलेला विश्वास आजही कायम आहे.

विरोधकांकडून इम्तियाज जलील यांच्यावर मतांचे राजकारण म्हणून आंदोलनात सहभाग घेतल्याचा आरोप केला गेला. पण त्याकडे दुर्लक्ष करत ते अजूनही ठेवीदारांच्या बाजूने उभे आहेत. नुकतीच रमजान ईद साजरी झाली, मुस्लिम धर्मीयांमध्ये या सणाचे मोठे महत्त्व आहे. ईदनंतर नातेवाईक, मित्र मंडळी व आप्तेष्ठांसाठी शिरखुर्म्याचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. यंदा लोकसभा निवडणूक असल्यामुळे अशा शिरखुर्मा पार्ट्यांना उधाण येणार आहे. अशीच एक शिरखुर्मा पार्टी इम्तियाज जलील यांनी आदर्शच्या ठेवीदारांसाठी आज ठेवली होती.

मोठ्या संख्येने ठेवीदार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ठेवीदारांच्या कोट्यवधीच्या ठेवी मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या इम्तियाज यांच्या पाठीशी हेच ठेवीदार आता मतदार म्हणून भक्कमपणे उभे राहणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. इम्तियाज यांनी आयोजित केलेली शिरखुर्मा पार्टी ही कुठलाही राजकीय हेतू किंवा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून केली नसावी, अशी अपेक्षा आहे. मात्र विरोधक याकडे राजकारण म्हणूनच पाहणार हे वेगळं सांगायला नको.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT