Shivsena Abdul Sattar .jpg Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News: शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांनी तब्बल सात वर्षांनी पुन्हा गाठलं 'काँग्रेस' भवन; जुन्या मित्राची घेतली भेट, नवे राजकीय संकेत?

Chhatrapati Sambhajinagar Politics: काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत अब्दुल सत्तार यांनी जिल्हाध्यक्ष असताना शहरातील काँग्रेस कार्यालयातून खुर्च्याही पळवल्याचा किस्सा आजही चवीने चर्चिला जातो. तेच अब्दुल सत्तार आज सात वर्षांनी काँग्रेसच्या गांधी भवनात दाखल झाले.

सरकारनामा ब्यूरो

नवनाथ इधाटे

Shivsena-Congress News : शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकवला होता. काँग्रेसमध्ये असताना सत्तार यांनी उघडपणे एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना मदत केल्याचा तेव्हा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या मदतीमुळेच छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता.

त्यानंतर काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत अब्दुल सत्तार यांनी जिल्हाध्यक्ष असताना शहरातील काँग्रेस कार्यालयातून खुर्च्याही पळवल्याचा किस्सा आजही चवीने चर्चिला जातो. तेच अब्दुल सत्तार आज सात वर्षांनी काँग्रेसच्या गांधी भवनात गेले होते. अर्थात निमित्त होते त्यांचे काँग्रेसमधील जुने मित्र जगन्नाथ खाले यांच्या वाढदिवसाचे.

२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी मित्र बदलला. रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काँग्रेसच्या कल्याण काळे यांना मदत केली. दानवे यांची डबल हॅट्रीक या नव्या राजकीय समि‍करणामुळे हुकली. सध्या काळे आणि सत्तार यांचे चांगलेच गुळपीठ आहे. कल्याण काळे-अब्दुल सत्तार यांचे 'एकमेका सहाय्य करू' हे सध्या सुरूच आहे.

अशावेळी आपल्या मित्राच्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी अब्दुल सत्तार धावत आले. त्यासाठी काँग्रेस भवनात जाण्यातही त्यांना कमीपणाचे वाटले नाही हे विशेष. जगन्नाथ काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या काँग्रेस भवनातील या एन्ट्रीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. प्रेरणा बँकेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण गांधी भवनात आलो असल्याचे आमदार सत्तार यांनी स्पष्ट केले.

गांधी भवन हे काँग्रेसच्या राजकारणाचे शहरातील महत्त्वाचे केंद्र मानले जाते. अशा ठिकाणी सत्तार यांनी अचानक हजेरी लावल्याने त्यांच्या भेटीकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, सत्तार यांचे काँग्रेसशी जुने राजकीय संबंध राहिले आहेत. काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू केल्यानंतर त्यांनी पुढे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सत्तारांची गांधी भवनातील उपस्थिती अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरली.

जगन्नाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्तार यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी झालेली ही सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी सांगितले असले, तरी राजकारणात नेत्यांच्या अचानक भेटीगाठींना वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जातात. त्यामुळे सत्तार यांच्या या भेटीमुळे स्थानिक राजकीय समीकरणांपासून आगामी घडामोडींपर्यंत विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

विशेष म्हणजे, खासदार डॉ. कल्याण काळे आणि आमदार अब्दुल सत्तार हे दोघेही मराठवाड्यातील राजकारणातील परिचित चेहरे आहेत. सिल्लोड आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातील राजकारणात दोन्ही नेत्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व आहे. अशा पार्श्वभूमीवर काळे कुटुंबाशी संबंधित कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्तार गांधी भवनात पोहोचल्याने राजकीय चर्चांना अधिकच रंग चढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT