Bhagat Singh Koshyari-Chandrakant Khaire
Bhagat Singh Koshyari-Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

शिवसेना नेते खैरे राज्यपालांना भेटले, भगवी शाल देत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या...

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि त्यातल्या त्यात शिवसेनेचे (Shivsena) आणि त्यांचे संबंध किती ताणले गेलेले आहेत हे अनेक घटनांवरून समोर आले आहे. (bhgat singh Koshyari) हिवाळी अधिवेशना दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाठवलेले पत्र यावरून देखील राज्यपाल आणि शिवसेनेत चांगलीच खडाजंगी पहायला मिळली. असे असले तरी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी दोन दिवसांपुर्वी मुंबईतील राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली.

आता ही भेट नेमकी कशासाठी होती? या बैठकीत काही राजकीय चर्चा झाली का? हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी खैरे यांनी मात्र आपण राज्यपालांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, असे म्हटले आहे. राज्यात सत्तातंर झाले तेव्हापासून म्हणजेच अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये खटके उडत आले आहेत.

महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल हे एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागत असल्याची टीका त्यांच्यावर केली होती, तर भाजपने मात्र तुम्ही घटनेच्या विरोधात वागाल तर राज्यपाल त्यांच्या अधिकाराचा वापर करतीलच, असे म्हणत राज्यपालांची बाजू घेतली होती. विधानसभा अध्यक्षपदाचा वाद आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेले पत्र, त्यातील भाषा यावरून देखील बराच वाद रंगला.

एकीकडे शिवसेना विरुद्ध राज्यपाल असे चित्र असले तरी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ७ जानेवारी रोजी राज्यपालांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ दिला. अचानक झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे मराठवाड्यातील मोठे नेते आहेत. दोनवेळा आमदार, राज्यात विविध खात्याचे मंत्री, केंद्रात सलग चारवेळा खासदार म्हणून निवडून गेलेले, त्यामुळे गेल्या निवडणूकीत पराभव झाला असला तरी पक्षात अजूनही त्यांना मानाचे स्थान आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी एका बैठकीसाठी खैरे यांना बोलावले होते. देसाई यांच्यासोबतची बैठक झाल्यानंतर खैरेंनी थेट राजभवन गाठले आणि राज्यपालांची भेट घेतली. या भेटी संदर्भात `सरकारनामा`, ने खैरेंशी संपर्क साधला तेव्हा खैरे म्हणाले, ही सदिच्छा भेट होती, राज्यपालांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि आमच्यामध्ये बऱ्याच गप्पा देखील झाल्या. राज्यपाल कोश्यारी आणि माझी जुनी ओळख आहे.

२०१४ ते २०१९ दरम्यान आम्ही सोबत काम केले आहे. शिवाय केंद्राच्या विविध समित्यांमध्ये देखील आम्ही एकत्र होतो. त्यामुळे अनेक दौऱ्यावर सोबत जाण्याचा देखील योग आला. ते माझे चांगले मित्र आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ते राज्यपाल झाल्यापासून माझी त्यांची प्रत्यक्ष भेट नव्हती. मध्यंतरी त्यांनी फोन करून मला भेटीसाठी देखील बोलावले होते.

परवा मुंबईत आमचे नेते सुभाष देसाई यांनी बैठकीसाठी बोलावले होते. बैठक झाल्यानंतर मी राज्यपालांना भेटीसाठी वेळ मागितला आणि त्यांना मला तात्काळ तो दिला. त्यांना भेटून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, अनेक विषयांवर चर्चा झाल्या पण त्या सांगणार नाही, ही फक्त सदिच्छा भेट होती एवढेच सांगतो, असे म्हणत खैरे यांनी या भेटीवर अधिक बोलणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT