Mla Laxman Pawar- Jaydatta Kshirsagar
Mla Laxman Pawar- Jaydatta Kshirsagar Sarkarnama
मराठवाडा

भाजप आमदारांच्या निधीतल्या सभागृहाच्या भूमिपुजनाला शिवसेना नेत्याचे हात

Dattatrya Deshmukh

बीड : राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असे चित्र आणि कलगीतुरा गाजत आहे. जिल्ह्यात मात्र भाजप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचे नेते एका व्यासपीठावर तर आलेच, शिवाय भाजप आमदारांच्या स्थानिक विकास निधीतील सभागृह बांधकामाचे भूमिपुजनही शिवसेनेच्या माजी मंत्र्यांच्या हस्ते झाले.

तसे, बीड जिल्ह्यात राज्याच्या राजकीय समिकरणांनुसार कधीच राजकारण होत नाही. एखाद्या निवडणुकीत राज्याचा कल एकिकडे आणि जिल्ह्याचा भलतीकडेच असतो. पुर्वी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी जिल्ह्यातील बहुतेक नेत्यांचे आतुन मैत्रीपुर्ण संबंध असत. म्हणूनच लोकसभेला मोठ्या मताधिक्क्याने विजयी होत व बदल्यात नंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभेला जास्त जागा राष्ट्रवादीच्या विजयी होत.

मागच्या महायुती सरकारच्या काळातही पंकजा मुंडे व जयदत्त क्षीरसागर यांच्यात मैत्रीपूर्ण राजकीय संबंध होते. पण, क्षीरसागरांना त्यांनी भाजपवासिय होऊ दिले नाही हा भाग अलहिदा. विशेष म्हणजे तेव्हा एकाच पक्षात असतानाही पंडित -क्षीरसागरांचे कधी जुळले नाही.

एकेकाळी पंडित व क्षीरसागर काँग्रेसमध्ये असताना जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांच्या पुतणे बदामराव पंडित यांच्याकडून झालेल्या पराभवात क्षीरसागरांनी मोलाचा हातभार लावला. त्याचे उट्टे पंडितांनी दिवंगत नेत्या केशरबाई क्षीरसागर यांचा तत्कालिन भाजप उमेदवार रजनी पाटील यांच्याकडून पराभव घडवून काढले.

पुढेही जयदत्त क्षीरसागर व अमरसिंह पंडित एकाच राष्ट्रवादीत असतानाही त्यांचे कधी जुळले नाही. आताही महाविकास आघाडी असली तरी बीडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीचे कधीच पटत नाही. दरम्यान, आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी आहे. तर, भाजप विरोधी पक्षात आहे.

राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप व राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असे द्वंद नेहमीच पहायला मिळते. सध्याही राज्यात हा कलगीतुरा रंगलेला असताना जिल्ह्यात वेगळेच चित्र पहायला मिळाले. गेवराई मतदार संघातील भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी बीड शहराजवळील जिरेवाडी येथे आमदारांच्या स्थानिक निधीतून सभागृह मंजूर केले. अन् या सभागृहाचे भूमिपुजन शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

दोन्ही नेते कार्यक्रमात एकमेकांच्या कामांचे कौतुक करत होते. तसे गेवराईत शिवसेनेचे नेतृत्व बदामराव पंडित करत आहेत. पुर्वीपासून बदामराव पंडित क्षीरसागरांचे खंदे समर्थक मानले जातात. मात्र, लक्ष्मण पवार - अमरसिंह पंडित द्वंदात ते जरा पिछाडीवर पडतात. म्हणून कदाचित हे नवे चित्र तर तयार होत नाही ना? अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT