Shivsena-Bjp-Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Mahayuti News : सत्तार म्हणतात भाजपचा सुपडासाप करू, तर प्रदीप जयस्वालांकडून पाडापाडी ची भाषा ; शिवसेनेचे नेते आक्रमक

Jagdish Pansare

Mahayuti Political News : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांसह इतर छोट्या-मोठ्या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी आगामी विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार, अशी घोषणा राज्यातील बड्या नेत्यांनी केली. जागावाटप अंतिम टप्प्यात आले असताना महायुतीमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत.

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, (Abdul Sattar) संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप जयस्वाल व इतरही काही नेत्यांकडून थेट पाडापाडीची भाषा सुरू झाली आहे. `एकत्र लढू ते पाडापाडी` हा प्रवास नेमका कसा झाला? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ पैकी केवळ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीला विजय मिळवता आला होता.

शिवसेनेचे संदिपान भुमरे विजयी झाल्यामुळे मराठवाड्यात महायुतीचे नाक राहिले. या विजयाने आत्मविश्वास बळवलेल्या शिवसेना शिंदे गटाने संभाजीनगरसह मराठवाड्यावर पकड मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात भाजपने दीडशे प्लस जागा लढवण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्तेच्या फ्रंट सीटवर असलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभर पेक्षा एकही जागा कमी लढवणार नाही, असा आक्रमक पवित्र घेतल्याची चर्चा आहे.

नेत्यांकडूनच आक्रमक भाषा सुरू झाल्यामुळे आता या पक्षातील मंत्री आणि आमदारांनी ही पाडापाडीची भाषा सुरू केली आहे. राज्याचे पणन व अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार सध्या चांगलेच चर्चेत आहेत. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी त्यांचे बिनसल्यामुळे दानवे यांनी सतारांना पराभूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. (Marathwada) सिल्लोड- सोयगाव मतदारसंघात सत्तार यांच्या विरोधात काढण्यात आलेला `हिंदू आक्रोश मोर्चा` हा त्याचाच भाग होता, असे बोलले जाते.

आपल्या विरोधात मोर्चा निघाल्यानंतर खवळलेल्या अब्दुल सत्तार यांनी थेट भोकरदन मध्ये भाजपचा म्हणजेच रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांचा सुपडा साफ करण्याचा इशारा देऊन टाकला. हे कमी की काय तिकडे संभाजीनगर मध्यचे विद्यमान शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांनी सकाळ `थेट भेट` उपक्रमात आम्हाला पाडण्याचा प्रयत्न झाला किंवा आमची जागा असताना मित्र पक्षांनी उमेदवार उभे केले तर आम्हीही उमेदवार उभे करू आणि त्यांचे पाडू, असा थेट इशारा भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या मित्र पक्षांना दिला आहे.

विशेष म्हणजे नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांनी 2029 मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार आणा असे, आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांना केले होते. याचे तीव्र पडसाद उमटायला लागल्यानंतर शहा यांना मित्र पक्षाच्या उमेदवारांनाही निवडून आणा, असे आवाहन करावे लागले. त्यानंतरही विधानसभा निवडणुकीचे जागावाटप जाहीर होण्यापूर्वी महायुतीमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या गोटात मात्र यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT