Shivsena UBT : नव्वद च्या दशकातील डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा फर्जन याच्या छत्रपती संभाजीनगर भागातील पडेगाव येथील बंगल्यावर गुन्हे शाखेने धाड टाकत मोठा शस्त्रसाठा, कोट्यावधीची रोख रक्कम, बंदुका व तब्बल सहा हजार जिवंत काडतुसे असे घबाड पोलीसांच्या हाती लागले. विशेष म्हणजे महिनाभरापुर्वीच बाबा फर्जन याचे निधन झाले होते. त्यानंतर झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली. मात्र पोलीसांची ही कारवाई संशयाच्या भोवर्यात अडकली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अठरा तास कारवाईत काय सापडले? रोख रक्कमेचा आकडा पोलीस लपवत आहेत का? या संदर्भात आपण पोलीस आयुक्तांशी बोलणार असल्याचे सांगत त्यांनी एकूणच या कारवाईबद्दल शंका उपस्थित केली होती. आता संजय शिरसाट यांचीच री ओढत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी आपण संजय शिरसाट यांच्या भूमिकेशी सहमत आहोत. ही कारवाई संशयास्पद आहे, असे माझेही मत आहे. कोरोना आधीपर्यंत आपण स्वतःही बाबा फर्जन यांच्या घरी जात होतो, असा गौप्य स्फोटही दानवे यांनी केला.
बाबा फर्जन हा 1990 च्या काळातील शहरातला डॉन म्हणून ओळखला जायचा. कामगार संघटनांच्या माध्यमातून फर्जन याने आपले स्वत:चे साम्राज्य उभे केले होते. जमिनीचे व्यवहार, परवान्यावर शस्त्रास्त्रांची खरेदी विक्री यातून बाबा फर्जन याने कोट्यावधीची माया जमवली होती. यातूनच त्याने राजकारणातही आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवलेल्या बाबा फर्जन याचा तेव्हा पराभव झाला होता. त्यानंतर पुन्हा तो राजकारणाकडे वळला नाही. परंतु त्याचे राजकीय नेत्यांशी चांगले संबंध होते. विशेषतः हिंदुत्ववादी संघटनांशी तो जवळीक साधून होता, असे बोलले जाते.
गुन्हे शाखेला खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलीसांनी बाबा फर्जन याच्या पडेगाव येथील बंगल्यावर मध्यरात्री उशीरा धाड टाकली. या धाडीत बंगल्यात तब्बल सव्वा पाच कोटी रूपयांची रोकड, बंदुका, तलवारी, चाकू अशी घातक शस्त्रे, सुमारे सहा हजार जिवंत काडतुसे आणि इतर असा मोठा शस्त्रसाठा हाती लागला. बाबा फर्जन याच्या निधनानंतर तिथे शीला साळवे नावाची महिला वास्तव करत आहे. पोलीस तपासात आधी तिने आपण बाबा फर्जन याची पत्नी असल्याचे सांगीतले होते. परंतु आता आपला त्याच्याशी काही संबंध नाही, ही रोख रक्कम किंवा शस्त्रसाठा इथे कुठून आला, याची आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे तिने सांगीतले आहे.
बाबा फर्जन याच्या घरावर टाकण्यात आलेली धाड आणि या कारवाईत जप्त करण्यात आलेली रोख रक्कम व इतर शस्त्रसाठा यावरून आता राजकारणही पेटले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी बाबा फर्जन याच्या निधनानंतर या कारवाईचा अर्थ काय? पोलीस यातून काय सिद्ध करू पाहत आहेत. बाबा फर्जन हा परवान्यावर शस्त्रास्त्र बंदुका विकत होता, असा दावा संजय शिरसाट यांनी केला होता. पोलीस जप्त केलेल्या रक्कमेचा आकडा लपवत आहेत का? कारवाईसाठी पोलीसांना टीप कोणी दिली? या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपण या कारवाई संदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे शिरसाट यांनी म्हटले होते.
हो मी बाबा फर्जनकडे जायचो..
तर अशाच पद्धतीची कारवाईवर शंका आमदार अंबादास दानवे यांनीही व्यक्त केली आहे. बाबा फर्जन हा एक हिंदुत्ववादी डॉन होता. त्या काळातील शहराची परिस्थिती पाहता शस्त्रास्त्रासह तयारीने राहावे लागत होते. बाबा फर्जन याने 1988 च्या दंगलीमध्ये घराबाहेर येऊन आपल्या बंदुकीतून गोळ्याही झाडल्या होत्या, अशी आठवणही अंबादास दानवे यांनी सांगीतली. मी स्वत: कोरोना काळाच्या आधीपर्यंत बाबा फर्जन याच्या घरी जायचो, हे सांगायला मला लाज वाटायचे काही कारण नाही. संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेली शंका रास्त आहे, माझे या बाबतीत त्यांच्याशी एकमत असल्याचेही दानवे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.